Join us  

‘गोखले’चा दुसरा गर्डर ३० सप्टेंबरपर्यंत बसवणार; पावसाळ्यात नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 10:50 AM

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे सुटे भाग मुंबईत येण्यास उशीर झाला आहे.

मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे सुटे भाग मुंबईत येण्यास उशीर झाला आहे. याप्रकरणी पालिकेकडून महापालिका प्रशासनाने कंत्राटदाराकडून खुलासाही मागवला आहे. सदर खुलासा तो समाधानकारक नसल्यास कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. तरीही ३१ जुलैपर्यंत दुसऱ्या गर्डरचे सगळे भाग एकत्र करून येत्या ३० सप्टेंबरपर्यंत गर्डर उभारण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

गोखले पुलाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर एक बाजू १५ महिन्यांनी (२६ फेब्रुवारी) सुरू झाली होती. एप्रिलच्या सुरुवातीला पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या गर्डरचे भाग दिल्लीहून मुंबईत आणण्यास सुरुवात झाली होती. 

सर्व भाग आल्यानंतर ते जोडून ३१ मेपर्यंत  गर्डर स्थापन करणे, पुलाचे पोहोच रस्ते तयार करणे आणि ३१ डिसेंबरपर्यंत संपूर्ण पूल वाहतुकीसाठी सुरू करणे असे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुलाच्या गर्डरचे ३२ सुटे भाग २२ एप्रिलपर्यंत मुंबईत येणे अपेक्षित होते व ३० एप्रिलपासून पुलाची जोडणी सुरू करण्यात येणार होती. मात्र, अद्याप हे सर्व भाग आलेले नसल्याने  गर्डर स्थापन करण्याचे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

गर्डरचे सर्व सुटे भाग आल्यानंतरच पुढील गर्डर लाँचिंगची कामे होणार आहे.पूल खुले करण्यासह सर्व कामे यावर अवलंबून आहेत. गर्डर स्थापन करण्यासाठी क्रेन उभे करावे लागत असल्यामुळे आधी पोहोच रस्ते तयार करता येत नाहीत. 

पावसाळ्यात नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका-

गोखले पूल आणि बर्फीवाला पुलाच्या जोडणीचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. पुलाचे चार स्तंभ हे जॅकच्या साहाय्याने उचलण्यात येत असून आतापर्यंत १४० किमीपर्यंत हे स्तंभ उंच उचलण्यात आले आहेत. त्यामुळे ठरल्याप्रमाणे हे काम जूनअखेर पूर्ण होईल, असा विश्वास पालिकेला आहे. नागरिकांसाठी पावसाळ्यात वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार नाही.

सुटे भाग जोडल्यानंतर रेल्वेकडून रुळांवरील कामांसाठी ब्लॉक घेतला जाईल, त्यानंतर गर्डर स्थापन करून पोहोच रस्त्याची कामे केली जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अंबाला येथील कारखाना हा रेल्वे प्रशासनाने प्रमाणित केलेला आहे. पालिकेने कंत्राटदाराला दिलेल्या नोटिशीत गर्डरचे सुटे भाग येण्यास उशीर का झाला, याची कारणे कंत्राटदाराला विचारण्यात आली आहेत. 

समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास कंत्राटदाराला वाढीव मुदत न देता कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाअंधेरी