Join us  

राणीबागेतील प्राणी थंडगार मेजवानीने झाले ‘कूल कूल’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 11:12 AM

गेली काही दिवसांपासून मुंबई शहर आणि परिसरात तापमान ३५ डिग्री पार गेल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई : गेली काही दिवसांपासून मुंबई शहर आणि परिसरात तापमान ३५ डिग्री पार गेल्याचे पाहायला मिळत आहे. अशा रणरणत्या गरमीत भायखळा येथील राणीच्या बागेतील प्राणी व पक्षी कलिंगड, आइस फ्रूट केक, केळी, गारेगार उसाचा रस अशा मेजवानीचा आस्वाद घेत ‘थंडा थंडा...कूल कूल’चा अनुभव घेत आहेत. उकाडा वाढल्याने अशा प्रकारे पशुपक्ष्यांची काळजी घेतली जात आहे. 

यामध्ये प्राण्यांच्या प्रदर्शनी दालनापासून ते प्राण्यांच्या खाण्यापिण्याच्या सोयीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. मुंबईचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातल्या त्यात राणीच्या बागेत ६ हजारांहून अधिक झाडे असल्याने प्राण्यांना विसावा घेण्यासाठी सावली मिळत आहे. 

१) वातावरणातही गारवा टिकून राहत असल्याची माहिती राणीबागेचे जीवशास्त्रज्ञ अभिषेक साटम यांनी दिली. 

२) याशिवाय बागेतील प्राण्यांची काळजी घेण्यासाठी बागेतील परिसरात पाण्याची भांडी ठेवण्यात येत आहेत.

उन्हाच्या तडाख्यापासून वाचविण्यासाठी विशेष प्रयत्न -

राणीबागेत तयार करण्यात आलेल्या नवीन प्रदर्शनी या तापमानरोधक अशा पद्धतीच्या असल्याने प्राण्यांना उन्हाचा त्रास होत नाही. काही प्राण्यांसाठी गुहाही तयार करण्यात आल्याने ते तिथे जाऊन वेळ घालवितात. 

प्रत्येक प्रदर्शनीमध्ये वाहत्या पाण्याचे छोटे तलाव तयार केल्या हे प्राणी या तलावात बसून गारवा अनुभवत असल्याचे पाहण्यास मिळते. बागेतील गवतावर आणि मातीवर पाणी मारले जाते. त्यामुळे वातावरणात ओलावा टिकून राहण्यास मदत होते. 

या ठिकाणी सुमारे ५० हरणे, २० ते २५ माकडे, हत्तीण, अस्वल, दोन बिबटे, दोन वाघ, दोन तरस, चार कोल्हे आणि  पक्षी आहेत. प्राणी घेत असलेल्या ‘गारेगार मेजवानी’चा आस्वाद घेताना प्राण्यांना पाहून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचेही चांगलेच मनोरंजन होत आहे. यामध्ये प्राण्यांना कलिंगड, चिकू, पेरू, हत्ती-अस्वलासाठी केक, माकडांसाठी गोळा, काकडी, मोसंबी, फणस, हिरव्या भाज्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. - डॉ. अभिषेक साटम, जीवशास्त्रज्ञ, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय

टॅग्स :मुंबईभायखळाराणी बगीचा