जयंत होवाळ -
मुंबई : पावसाळा पूर्व नालेसफाईच्या कामाला मुंबई महापालिकेने वेग दिला असला तरी वन क्षेत्राच्या हद्दीतील नाल्यांमधील गाळ काढण्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वन विभागाच्या हद्दीतील नाल्यांची सफाई करण्याची जबाबदारी तुमची असून नालेसफाईची कामे त्वरित हाती घ्यावीत, असा सल्ला पालिकेने वन विभागाला दिला आहे. त्यामुळे या भागात मान्सूनपूर्व कामांचा भाग असलेल्या नालेसफाईची कामे रखडली आहेत.
मुंबईतील काही नाले हे सीआरझेड क्षेत्रात येतात. हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या भागातील इमारतींच्या पुनर्विकासाचे गाडे अडले आहे. त्यातच आता नालेसफाईचा पेच निर्माण झाल्याने येथील रहिवाशांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. येथील नाल्यांची सफाई होत नसल्याने ते गाळाने अक्षरश: भरले असून त्याचा स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
वनक्षेत्राच्या हद्दीतील नाले कुर्ला १ चेंबूर पूर्व ७ चेंबूर पश्चिम २ घाटकोपर ४ भांडुप ४ मुलुंड ३
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कशी होणार?पालिकेने नाल्यांची सफाई करण्याची जबाबदारी वन विभागाची असल्याचे सांगितल्याने पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर आलेल्या पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची सफाई कशी होणार, असा प्रश्न रहिवासी करत आहेत.
विशेष यंत्रसामग्रीची गरजवनक्षेत्राच्या नाल्यांमधील गाळ काढणे आणि साफसफाई करणे हे एक विशेष काम आहे ज्यासाठी विशेष यंत्रसामग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्याची गरज असू शकते. त्यामुळे संवेदनशील वनक्षेत्रांना होणारे संभाव्य नुकसान टळू शकते. आमच्या यंत्रणेने पाहणी केली असता वन विभागातील नाल्याची सफाई अजूनही झाली नसल्याचे निदर्शनास आले असून ही कामे त्वरित हाती घ्यावीत, असे पालिकेने वन विभागला कळविले आहे.
पत्र देत केल्या कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचनाविभाग वन अधिकारी (ठाणे खाडी) यांनी त्यांच्या अखत्यारितील पूर्व द्रुतगती महामार्गावरील उषानगर नाला, बॉम्बे ऑक्सिजन नाला, सीआरझेड क्षेत्रातील क्रॉम्प्टन नाला, विक्रोळी कन्नमवार नगर येथील इमारत क्रमांक ४४ मागील कन्नमवार नगर नाला या नाल्याची सफाई त्वरित करावी, अशी सूचना पालिकेने वन विभागाला केली आहे