Join us

म्युझियम ऑफ सोल्यूशनमध्ये आता शहरी शेतीचे नवे दालन! लहानग्यांना अनुभवता येणार निसर्गाचे चक्र

By स्नेहा मोरे | Updated: January 2, 2024 20:32 IST

Mumbai: वरळी येथील म्युझिअम आॅफ सोल्यूशन या नव्याने सुरु झालेल्या संग्रहालयात आता नव्या वर्षात चिमुरड्यांसाठी नवे दालन थेट गच्चीवर सुरु करण्यात येणार आहे.

मुंबई -  वरळी येथील म्युझिअम आॅफ सोल्यूशन या नव्याने सुरु झालेल्या संग्रहालयात आता नव्या वर्षात चिमुरड्यांसाठी नवे दालन थेट गच्चीवर सुरु करण्यात येणार आहे. मार्च महिन्यात या संग्रहालयात शहरी शेतीचे धडे गिरवणारे नवे दालन मुंबईकरांच्या भेटीस येणार आहे. या माध्यमातून बीज, अंकुर , रोप, रोपटे असा झाडांचा उलडणारा प्रवास आणि त्यासह राहत्या घरातच शेतीशी नाळ जोडण्याची संकल्पना लहानग्यांना शिकण्यास मिळणार आहे.

नव्या संकल्पनेच्या माध्यमातून एकाच वेळी संग्रहालयातील नवतंत्रज्ञानाशी जोडले जात असताना शेती आणि निसर्ग चक्राचे महत्त्वही लहानग्यांना समजावे या उद्देशाने शहरी शेतीचे दालन क्युरेट करण्यात येणार आहे. मुख्यतः या संग्रहालयाची खासियत असल्याप्रमाणे, केवळ शहरी शेतीविषयी धडे न देता प्रत्यक्ष शेती करताना येणाऱ्या समस्या, त्यातील आव्हाने, त्यानंतर रोपांची वाढ, यशस्वीपणे पार पाडलेले टप्पे यांविषयी शिकताही येणार आहे. शहरी शेती ही केवळ एक ट्रेण्डी संकल्पना आहे; शाश्वत, लवचिक आणि जोडलेले भविष्य निर्माण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शहरी शेती स्वीकारून आपण पर्यावरणीय पाऊलखुणा कमी करू शकतो, अन्न सुरक्षा वाढवू शकतो आणि समृद्ध समुदाय निर्माण करू शकतो त्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी संग्रहालयाने मुंबईकरांसाठी ही नवी भेट नव्या वर्षात आणली आहे.

‘म्युझियम ऑफ सोल्युशन्स’ हे ना नफा तत्त्वावरील असून येथे मुलांना मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळावी, तसेच त्यांचे कुतूहल शमावे, यासाठी ५० उपक्रम तयार केले आहेत. या ठिकाणी प्रदर्शन, शैक्षणिक अनुभव, मनोरंजनातून शिक्षण, कलादालन, वस्तुसंग्रहालय आणि विक्री केंद्र आदी बाबी असतील. त्यातून मुलांना उपयुक्त अनुभव मिळतात.  या म्युझियममध्ये तळागाळातील मुलांना विनामूल्य अनुभव दिले जावे, ही म्युझियमची संकल्‍पना आहे.  केवळ पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञानही त्यांना मिळावे आणि ते पर्यावरणपूरक प्रकारे मिळावे, या हेतूने म्‍युझियमची निर्मिती झाल्याचे सांगितले आहे. दरवर्षी अनेक शाळांमधील मुलांना येथे आमंत्रित केले जाते. त्यातील निम्म्या म्हणजे सुमारे ५० हजार मुलांना नि:शुल्क प्रवेश मिळतो. अंगणवाडी, सरकारी शाळा, महापालिका शाळा, विशेष मुलांसाठीच्या शाळा आदी सर्वांमधील मुलांना येथे बरेच काही शिकता येते. 

टॅग्स :शेती क्षेत्रमुंबई