Join us  

पालिका कंत्राटदाराला चाकूच्या धाकात धमकावत खंडणीची मागणी  

By मनीषा म्हात्रे | Published: March 29, 2024 7:21 PM

Mumbai Crime News: पालिका कंत्राटदाराकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक केली आहे.

मुंबई - पालिका कंत्राटदाराकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक केली आहे. भाईंदर येथील रहिवासी असलेले राजू सुधार (२४) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. जानेवारी ते २३ मार्च २०२४ दरम्यान राजू यांना पालिकेकडून चुनाभट्टी येथील पाण्याचे पाईप लाईनचे काम मिळाले होते. हे काम करत असताना, पिंट्याभाई और फल्लेभाई यांच्या गॅगला हप्ता दयावा लागेल असे आकाश खंडागळे, रोशन व ऋषिकेश यांनी धमकावले. रोशन याने राजू यांना चाकु दाखवुन जीवेठार मारण्याची धमकी दिली. त्याच प्रमाणे आकाश कडील फोन वरुन पिन्टया व फल्लेनावाच्या आरोपींनी हप्ता देण्यास धमकावून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

१३ मार्च रोजी ऋषिकेश, रोशन व आकाश यांनी राजू तसेच त्यांचे साईटचे मुकादम रमेश देवासी यांची वाट अडवून जबरदस्तीने त्यांच्या खिशातील पैसे काढून घेतले.  तसेच त्यांच्या साईडवरील कंपनीचे पाईप घेवून गेले. अखेर आरोपीकडून दबाव वाढताच तक्रारदार यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, गुरुवारी पोलिसांनी जबरी चोरीसह खंडणीचा गुन्हा नोंदवत, आकाश बाळु खंडागळे (३१), उमेश मारूती पल्ले (४०), राकेश उर्फ पिंन्टया रमेश राणे (४५) आणि ऋषीकेश आदिनाथ भोवाळ (२२) या चौकडीला अटक केली. पिंट्या अभीलेखावरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी देखील कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी