Join us  

खारफुटीचं सर्वात मोठं जंगल! विक्रोळी अन् पवईची 'ही' स्टोरी माहित्येय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 10:20 AM

महिकावती बखरीत पोवे गावापाशी ‘विखरवळी’ नावाचं गाव असल्याचा उल्लेख आढळतो. तीच आजची ‘विक्रोळी’ आणि ती ज्या ‘पोवे’ गावापाशी आहे ते आजचं ‘पवई’.

संजीव साबडे, मुक्त पत्रकार

महिकावती बखरीत पोवे गावापाशी ‘विखरवळी’ नावाचं गाव असल्याचा उल्लेख आढळतो. तीच आजची ‘विक्रोळी’ आणि ती ज्या ‘पोवे’ गावापाशी आहे ते आजचं ‘पवई’. इंग्रजीत आजही त्यामुळे विखरोळी असं लिहिलं जातं. 

ब्रिटिश  काळापासून मुंबई परिसराच्या विकासासाठी संबंधित भाग वा गावे भाडेपट्ट्याने देण्याची पद्धत होती. नंतरही उद्योग उभारणी व रोजगार निर्मितीच्या कारणास्तव जमीनदार व उद्योगपतींनी सरकारकडून कमी दरात, मोफत वा ठरावीक भाडेपट्ट्याने जमिनी मिळवल्या. बायरामजी जीजीभाई, एफ. ई. दिनशा तसेच अजमेरा, हिरानंदानी, रहेजा हे बिल्डर्स आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट हे मुंबईतील मोठे जमीनदार आहेत. पण, सर्वांत मोठा जमीनदार म्हणजे गोदरेज. आज गोदरेज यांच्याकडे तब्बल ३४०० एकर जमीन आहे आणि तीही एकट्या विक्रोळी गावात. आता विक्रोळीचा इतका प्रचंड विकास झालाय की ते एक छोटं शहरच झालं आहे. 

गोदरेजच्या पूर्व व पश्चिम भागाचा विकास प्रामुख्याने झाला तो गोदरेज अँड बॉयजमुळे. तुम्ही पूर्व द्रुतगती मार्ग किंवा लाल बहादूर शास्त्री मार्गावरून जा, तुम्हाला गोदरेजचे उद्योग आणि गोदरेजच्या कर्मचारी वसाहती यांचं दर्शन घडतं. याशिवाय गोदरेज बांधकाम उद्योगात असल्यानं त्यांनी बांधलेले टॉवर्स दिसतात,  विक्रोळीत सबकुछ गोदरेज आहे. गोदरेज हा सव्वाशे वर्षांहून अधिक जुना उद्योग समूह. विक्रोळीच्या पूर्वेला एका बाजूला कन्नमवार नगर ही २६५ इमारतींची म्हाडाची प्रचंड वसाहत आहे. दुसरीकडे टागोर नगर हीही म्हाडाचीच कॉलनी. या दोन्ही वसाहतींनी आजही आपलं मराठीपण कायम राखलं आहे. पार्कसाइट भागातही मराठी भाषकच अधिक. पूर्वीच्या कामगारांच्या घरांना आलेलं मध्यमवर्गीय रूप पाहून छान वाटतं.

पवई व घाटकोपरला लागून असूनही इथं मराठी लोक आजही दिसतात. अर्थात आता तिथं जे टॉवर्स येत आहेत, तिथलं चित्र मात्र वेगळं आहे. शिवाय जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडमुळे हा भाग पश्चिम उपनगराच्या जवळ आला आहे. अंधेरी-विक्रोळी मेट्रोचं कामही सुरू आहे. हायवेने जाताना एका बाजूला गोदरेज कंपनीची मालमत्ता दिसते आणि समोर खारफुटीचं प्रचंड जंगल. काही हजार एकरात पसरलेलं. भारतातील हे सर्वांत मोठं खारफुटीचं जंगल आहे. त्याचाही काही भाग गोदरेज यांच्या मालकीचा आहे आणि मुख्य म्हणजे खारफुटीचं जंगल टिकवून ठेवण्यात गोदरेज मंडळींचा मोठा वाटा आहे. त्या जंगलात देश-विदेशातील पक्षी येतात. प्रिन्स चार्ल्स मुंबईत आले, तेव्हा त्यांनी बोटीत बसून या खारफुटीच्या जंगलाची पाहणी केली होती. ही खारफुटी व पुढील मिठागर टिकवणं गरजेचं आहे. खारफुटीसाठी तर गोदरेज हवेतच! त्यांनी खारफुटीच्या जंगलाची काळजी घेतली नसती तर आज हा भाग अनधिकृत घरांचा आगार बनला असता.

टॅग्स :मुंबई