Join us  

चारकोप येथील तलाव अखेर घेणार मोकळा श्वास, नाल्याचे स्वरूप आलेल्या तलावाचे सुशोभिकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 8:24 PM

शासनाच्या मालकीच्या जागेवर हे तलाव असल्याने सुशोभिकरण करण्याच्या पालिकेच्या प्रस्तावावर उपनगर जिल्हाधिकारी यांनी ना- हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

मुंबई - मागील काही वर्षांमध्ये नाल्याचे स्वरूप आलेल्या कांदिवली येथील चारकोप सेक्टर ७ मधील तलावाच्या सुशोभिकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आवश्यक परवानगी मिळविण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना विरंगुळ्यासाठी लवकरच एक ठिकाण उपलब्ध होणार आहे.  

चारकोप सेक्टर ७ मधील खाडीजवळी असलेल्या या तलावाच्या भागात समुद्रात भरती असताना राजेंद्र नगरमधून वाहणाऱ्या नाल्यातील कचरा, प्लास्टिक जमा होतो. त्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने या तलावाचे सुशोभिकरण करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार आराखडा आणि संकल्पचित्र तयार करण्यात आले. तसेच कोलाज डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड यांची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.  

३१ टक्के कमी खर्चात काम.... 

या तलावाच्या सुशोभिकरणासाठी महापालिकेने ८.१८ अंदाजित खर्च वर्तवला होता. मात्र निविदाकारांनी ३१.५९ टक्के कमी खर्चाची बोली लावली. त्यानुसार पिरॅमीड कंट्रक्शन’ या कंपनीला विविध करांसह ७.७१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. या तलावाचे क्षेत्रफळ ४२६४.२८ चौरस मीटर आहे. हे काम पावसाळा वगळून १८ महिन्यांमध्ये पूर्ण केले जाणार आहे.  

या परवानग्या मिळाल्या... 

शासनाच्या मालकीच्या जागेवर हे तलाव असल्याने सुशोभिकरण करण्याच्या पालिकेच्या प्रस्तावावर उपनगर जिल्हाधिकारी यांनी ना- हरकत प्रमाणपत्र दिले आहे. तसेच सुशोभिकरणाच्या प्रारुप आराखड्यास तीवर क्षेत्र, महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण( एम. सी. झेड. एम. ए.) आणि राज्य पर्यावरण प्रभाव आकलन प्राधिकरण (एस. ई.आय. ए .ए.) यांची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार सहभागाने केलेला प्रकल्प आराखडा आणि संकल्पचित्रानुसार आता त्या तलावाचे सुशोभिकरण केले जाणार आहे.  

असे होणार सुशोभिकरण.... 

प्रवेशद्वार आश्रय स्थान तयार करणे, शौचालय बांधणे, तलावाच्या सभोवती पदपथ तयार करणे, खुली व्यायाम शाळा, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, प्रेक्षागृह तयार करणे, लाकडी पूल आणि तलावाच्या काठाला दगडी बांधकामाचे एकसंध बांधकाम करणे, तलावाच्या सभोवती सजावटीच्या प्रकाशयोजना, संरक्षित भिंत बांधणे.

टॅग्स :मुंबई