Join us  

लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वारातच ७ महिलांचे दागिने चोरीला, विसर्जनात चोरांची हातसफाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 12:56 PM

मुंबईत विसर्जन मिरवणुकीचा फायदा घेत चोरांनी मोबाइलसह किमती ऐवजावर चोरांनी डल्ला मारला.

मुंबई-

मुंबईत विसर्जन मिरवणुकीचा फायदा घेत चोरांनी मोबाइलसह किमती ऐवजावर चोरांनी डल्ला मारला. लालबागचा राजाच्या प्रवेशद्वारातच ६ ते ७ महिलांचे दागिने चोरीला गेले. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 

मुंबई शहरात गिरगांव, दादर, जुहू, मार्वे, आक्सा या विसर्जनस्थळांसह ७३ नैसर्गिक ठिकाणांव्यतिरिक्त १६२ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र गर्दीचा फायदा घेत लालबागच्या मिरवणुकीदरम्यान सर्वाधिक चोरीच्या घटना घडल्या. मात्र पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त तैनात केल्यामुळे चोरांनाही वेळीच ताब्यात घेतले. 

भोईवाडा परिसरात राहणाऱ्या सुनीता वाईंगडे (५५) यांची लालबागच्या मेन गेट समोरुन सोन्याची चैन चोरी केली. त्यांच्यासह एकूण ५ जणींची दीड लाख किंमतीच्या दागिन्यांची चोरी झाली. दुसरा गुन्हा अनुराधा पाठक महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामाध्या एकूण ४ जणींचे जवळपास सव्वा दोन लाख किंमतीचे दागिने चोरीला गेले आहे. दुसरीकडे खासगी बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले भावेश मल्होत्रा तसेच विवेकानंद गुप्ता यांचा महागडा फोन चोरट्यांनी चोरला. तसेच साताऱ्याचे रहिवासी असलेले महेश ओंबळे यांचाही मोबाइल चोरीला गेला. याची तक्रार काळाचौकी पोलिसांकडे केली. करी रोड येथील महिला सुमन गवादे यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरांनी पळवली. कांदिवली येथील रहिवासी असलेल्या गीता माळी यांचा मोबाइल चोरीला गेला. याशिवाय रायगड येथील रहिवासी अमोल पवार यांचाही मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली आहे. याशिवाय प्रिन्स प्रजापती, तुषार वामनसे यांच्या तक्रारीवरुनही काळाचौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

गणेशोत्सव काळात १४ गुन्हे दाखललालबागच्या राजाच्या ठिकाणी गेल्या १० दिवसात १४ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील ११ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. चोरांनी गर्दीचा फायदा घेत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा मुद्देमाल पळावला आहे. 

४५ ठिकाणी नाकाबंदी १५९८ विना हेलमेट कारवाईपोलिसांकडून ४५ ठिकाणी नाकांबी करत १ हजार २५८ वाहनांची झाडाझडती घेतली. ड्रंक अँड ड्राइव्हच्या ४ गुन्ह्यांसह १४० जणांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्य ४७ गुन्हे नोंदवले गेले आहेत. २ हजार ५९८ मोटारसायकल चालकांवर विना हेलमेट कारवाई केली. गणेश विसर्जनाला मुलुंडमध्ये गालबोट लागले आहे. मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याने तरुणावर चाकू हल्ला केला गेला. 

ड्रोन उडविणे पडले महागात मुंबईत ड्रोनबंदी असताना गिरगाव चौपाटीवर सर्वेश साबडा (२६) हा ड्रोन उडवत होता. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम १८८ अंतर्गत गुन्हा नोंदवत सर्वेशला नोटीस देऊन सोडले आहे.

टॅग्स :लालबागचा राजामुंबई