Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेस्टच्या नैमित्तिक कामगारांची दिवाळी होणार 'बेस्ट'; आमदार प्रसाड लाड यांनी दिला न्याय

By मनोहर कुंभेजकर | Updated: October 17, 2023 10:48 IST

बेस्टच्या नैमित्तिक कामगारांच्या १६ वर्षांपासून प्रलंबित प्रश्नाला वाचा फोडली

मुंबई : आपल्या मागण्या घेऊन बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागातील 725 नैमित्तिक कामगार काल पासून आझाद मैदानावर उपोषणासाठी बसले होते. त्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी व त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी श्रमिक उत्कर्ष  सभेशी संलग्न असलेल्या द इलेक्ट्रिक युनियनचे अध्यक्ष व भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी पुढाकार घेतल्याचे यावेळी दिसून आले. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी आमदार लाड यांनी उपोषणकर्त्या कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला आहे.आणि जल्लोष करत काल संध्याकाळी या बेस्टच्या कामगारांनी उपोषण मागे घेतल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली.

श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून बेस्टच्या  १२३ कंत्राटी कामगारांना तात्काळ पर्मनंट करण्यात येणार असल्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी तसेच बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी  दिले. तसेच उर्वरित ६०० कामगारांना टेंपररी  करण्यात येईल असे सांगितले व यापुढील काळात जागा उपलब्धतेनुसार टेंपररी कामगारांना देखील पर्मनंट करण्यात येणार असल्याची माहिती या प्रसंगी देण्यात आली . हा कामगार एकजुटीचा विजय असल्याचे मत आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले . 

उद्धव ठाकरे गटाकडे असलेल्या बेस्ट कामगार सेनेने , बेस्टच्या या नैमित्तिक कामगारांना एवढी वर्षे न्याय दिला नव्हता. श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून १६ वर्षापासून प्रलंबित असलेल्या या विषयाला सोडविण्याचा आम्ही प्रयत्न केला असल्याची भावना यावेळी आमदार लाड यांनी यावेळी व्यक्त केली .

आमदार लाड यांनी श्रमिक उत्कर्ष सभा ह्या कामगार संघटनेच्या माध्यमातून नुकतीच बेस्टच्या दि इलेक्ट्रिक युनियनची धुरा हाती घेतली असून, कामगारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी श्रमिक उत्कर्ष सभेचे जनरल सेक्रेटरी भालचंद्र साळवी, श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते संजय घाडीगावकर,रोहित  केणी,समीर जाधव, अशोक काळे यांच्यासह इतर उपस्थित होते.