Join us  

पुलाचा खर्च २.५ कोटींनी वाढला; नाहूर पूल ठरतोय पालिकेपुढील मोठी डोकेदुखी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 9:57 AM

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर मुंबई महापालिकेने नाहूर रेल्वे मार्गावरील पुलाचे काम हाती घेतले आहे.

मुंबई : गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर मुंबई महापालिकेने नाहूर रेल्वे मार्गावरील पुलाचे काम हाती घेतले आहे. पुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असले तरी खर्च अडीच कोटी रुपयांनी वाढला आहे. पुलाच्या ठिकाणी असलेली झाडे कापणे, त्यांचे पुनर्रोपण करणे, मलनिःसारण वाहिनीचे स्थलांतर करणे, पादचारी मार्गाऐवजी वाहनांसाठी भुयारी मार्ग बनवणे या कामांमुळे खर्चात वाढ झाली आहे. उड्डाणपुलांच्या खर्चात होत असलेली वाढ ही पालिकेपुढील मोठी डोकेदुखी ठरली आहे. 

नाहूर येथील पुलाच्या  पालिकेच्या हद्दीतील पोहोच मार्गासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. पुलाच्या कामासाठी नीरज  सिमेंट स्ट्रक्चरल लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली होती. १८ महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, त्यासाठी ७२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. 

पालिकेचा दावा काय?

१) नाहूर रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाच्या उत्तर मार्गाचे विस्तारीकरण व पुनर्बांधणी केली जाणार आहे. काम ८० टक्के पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा आहे. कंत्राटाची मूळ किंमत ७२ कोटी होती. आता ती ७४ कोटी ८२ लाख एवढी झाली आहे. 

२) मूळ कंत्राटात अन्य अत्यावश्यक कामांची भर पडल्याने खर्चात वाढ झाल्याचे सांगण्यात आले.  अतिरिक्त बाबींच्या खर्चासाठी १५ कोटी रक्कम गृहीत धरण्यात आली होती. मात्र वाढीव कामाचा खर्च वगळता १० कोटी रुपयांची बचत होणार असल्याचा पालिकेचा दावा आहे. 

ही आहेत वाढीव कामे -

१)  झाडे कापणे, त्यांचे पुनर्रोपण करणे. 

२)  उत्तर- पश्चिम बाजूकडील मलनिःसारण वाहिनीचे स्थलांतर

३)  पादचारी मार्गाऐवजी भुयारी मार्ग 

४)  पुलाच्या पूर्व बाजूस नाल्यावर छोटा पूल  आहे. तो नव्या आराखड्यानुसार बांधणे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकागोरेगावमुलुंड