Join us  

मुलाने डॉक्टर, इंजिनीअरच व्हावे, अपेक्षांच्या ओझ्याने वाढले डिप्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 2:12 PM

...तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, तरुण पिढी सतत मानसिक ताणतणावात दिसून येत आहे. तसेच मानसिक समस्यांमध्येही वाढ होताना दिसतेय.

मुंबई : मागील काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात वाढलेली स्पर्धा पाहता तरुण पिढीत नैराश्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालकांना त्यांचे न झालेले करिअर तसेच स्वप्न आपल्या पाल्यांकडून पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा असते. त्यामुळे त्यांच्या अपेक्षांच्या व्याख्या बदलल्या आहेत. परिणामी, तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, तरुण पिढी सतत मानसिक ताणतणावात दिसून येत आहे. तसेच मानसिक समस्यांमध्येही वाढ होताना दिसतेय.डॉक्टर, इंजिनिअर किंवा क्लास वन अधिकारी यांना समाजात सर्वांत जास्त मान मिळतो. त्यामुळे आपल्या मुलाने तसेच व्हावे, असा आग्रह पालकांचा असतो. शिवाय, अनेकदा पालकांचीही अधुरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाल्यांनी ठरावीक करिअरच निवडावे, असा पालकांचा हट्ट असतो.

मुलांना ठरवू द्या त्यांचे करिअरकरिअर वा उद्योजकता निवडण्याचे स्वातंत्र्य पाल्यांना दिले पाहिजे. त्याचप्रमाणे, यात येणारे यश - अपयश पचविण्यासाठी त्यातून पुन्हा नवी सुरुवात करण्यासाठी पालकांनी पाल्यांना बळ देणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या काळात वेगाने पुढे जाण्यासाठी दबावाने एखादे क्षेत्र निवडण्यापेक्षा संवाद, आवड, संधी दिली पाहिजे.डॉ. मानस कुमार, मानसोपचारतज्ज्ञ 

सक्ती नको, त्याचे पुढे दिसतील परिणाम... -मागील काही वर्षांत करिअर, उद्योजकता या क्षेत्रांच्या व्याख्या बदलल्याने पालक - पाल्य यांच्यातील अंतर वाढून याबद्दलचा संवाद खुंटला आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना करिअरविषयक सल्ला आवर्जून द्यावा. कुठल्याही प्रकारची सक्ती करू नये. त्याचे परिणामी पुढे दिसून येतात. पाल्यांमधील प्रयोगशीलताही जपावी.

-    बऱ्याचदा पालकांच्या वाढत्या अपेक्षांसाठी त्यांचा भूतकाळ आणि स्पर्धेत पुढे पहिला नंबर आलाच पाहिजे, असा दृष्टिकोन कारणीभूत ठरतो. 

डिप्रेशनमध्ये वाढ-   अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपण मागे राहतोय, नातेवाइकांमध्ये एखाद्या मुलाने यश पटकावले, ठरावीक क्षेत्राची निवड केल्यासच आदर आणि पैसे मिळतील, करिअरची स्पर्धा तुम्हाला समजणार नाही, अशा पालकांच्या विविध कठोर भूमिका - निर्णयांमुळे पाल्यांवर सतत दबाव येतो. - परिणामी, पाल्यांशी संवादाचा अभाव असल्याने त्यांना मानसिक ताण जाणवतो. त्यातून पुढे नैराश्याचा धोका असतो, अशा अनेक तक्रारी समोर येताना दिसतात.

- परिणामी, पालकांनी असे न करता पाल्याचा बुद्ध्यांक आणि कौशल्य यांचा समतोल साधला पाहिजे.