Join us

गायकांच्या ओठी सजला रामनामाचा सूर! प्राणप्रतिष्ठेच्या वातावरणात गायक-संगीतकारांना नवीन रामगीतांची मोहिनी

By संजय घावरे | Updated: January 20, 2024 17:43 IST

अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा जवळ आला आहे. श्री रामांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी एखाद्या नववधूसारखी सजली आहे.

मुंबई - अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा जवळ आला आहे. श्री रामांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी एखाद्या नववधूसारखी सजली आहे. प्रभूंच्या आगमनाचे वेध लागलेल्या वातावरणात श्रीरामांची महती वर्णन करणाऱ्या नवीन गीतांची रचना करण्याचा मोह गायक-संगीतकारांनाही आवरता आला नाही.

अयोध्येत प्रभूंच्या आगमनाची लगबग सुरू आहे, तर देशभर 'प्रभू रामाने दर्शन घ्यावे...' या शब्दांप्रमाणे गीत-संगीताद्वारे प्रभू श्रीरामांची आळवणी केली जात आहे. कुठे 'गीत रामायणा'च्या मैफिली रंगत आहेत, तर कुठे अल्बमद्वारे श्रीरामांचे नामस्मरण केले जात आहे. उदित नारायण, अलका याज्ञिक, शान, देवी चित्रलेखा, साचेत टंडन, प्रशांत इंगोले, आदर्श शिंदे,  प्रवीण कुवर, हर्षित अभिराज आदी गायकांनी अल्बमद्वारे नवीन गाणी सादर केली आहेत. 'जय श्रीराम, जय श्रीराम' म्हणत झी म्युझिकने उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील 'हम सब है श्री राम प्रभू के, हम सब के है राम...' हे गाणे रसिकांच्या भेटीला आणले आहे. समीर अंजान यांनी लिहिलेल्या या गाण्याला अहान शाह आणि ग्यानीता द्विवेदी यांनी संगीत दिले आहे. 'बजाओ ढोल स्वागत में, अवध में राम आए हैं...' हे गाणे शान आणि देवी चित्रलेखा यांनी गायले असून, गीतरचना हर्षित विश्वकर्मा यांची आहे. श्रीयांश प्रताप सिंग यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. गुलशन कुमार आणि टी-सिरीजची प्रस्तुती असलेले 'मेरे घर का कोना कोना रामनाम से जगमग है...' गीत साचेत टंडन यांनी गायले आहे. हे गाणे शब्बीर अहमद आणि हेमंत तिवारी यांनी लिहिले असून, शब्बीर यांनीच संगीतबद्ध केले आहे. मनोज मुंतशीर यांनी लिहिलेले 'रामलला...' भजन गायक-संगीतकार विशाल शर्मांनी गायले आहे. याला आदित्य देव यांचे संगीत लाभले आहे. यात भारती आचरेकरांनी मौन व्रत बाळगणाऱ्या रामभक्त स्त्रीची भूमिका साकारली आहे. 

'बाजीराव' फेम मराठमोळा गीतकार प्रशांत इंगोलेने 'हे राम राम, सिया राम राम...' हे व्हिडिओ साँग रसिकदरबारी सादर केले आहे. या गाण्यात प्रभू श्रीराम अयोध्येत परतत असून, जनता जनार्दन त्यांच्या स्वागतात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळते. रॅायल फॅलकॅान म्युझिकचे हे गाणे टिनू अरोरांनी संगीतबद्ध केले असून, अमित गुप्तांनी गायले आहे.

सप्तसूर म्युझिकचे 'प्रभू श्रीराम' या गीताच्या सुरुवातीला रामरक्षा स्तोत्रातील 'रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे...' हा श्लोक ऐकायला मिळतो. 'राम नाम की गूंज से दुनिया, चारों ओर से झूम पडी...' हे आदर्श शिंदेने गायले आहे. हे गीत ऋषी बी. आणि विपुल शिवलकर यांनी लिहिले असून, ऋषी यांनी संगीतबद्ध केले आहे.

'देखो अवध राम आये...' हे गाणे गायक-संगीतकार प्रवीण कुवर यांनी बनवले आहे. गायन, संगीत आणि प्रोग्रॅमर अशी तिहेरी जबाबदारी प्रवीण यांनी सांभाळली आहे. सुपरहिट संगीतची निर्मिती असलेले हे गाणे कौतुक शिरोडकरने लिहिले आहे. याखेरीज प्रवीण यांनी 'रामलल्ला आ गए...' हे आणखी एक हिंदी गाणे बनवले असून, याची निर्मिती आदित्य नायर प्रोडक्शनने केली आहे. 

उगम म्युझिकची निर्मिती असलेले 'श्रीराम जय राम...' हे गाणे गायक हर्षित अभिराजने गायले आहे. याचे लेखन-संगीत दिग्दर्शनही हर्षितने केले आहे.

टॅग्स :राम मंदिरअयोध्या