Join us
Daily Top 2Weekly Top 5

बसकंडक्टरला कड्याने मारत केले रक्तबंबाळ; चालकाशी वाद घालताना अडवल्याचा राग

By गौरी टेंबकर | Updated: December 31, 2023 15:02 IST

वीस वर्षीय तरुणाला मालाडमध्ये अटक

मुंबई: बसमधून उतरू द्या असा वाद चालकाशी घालणाऱ्याला शिविगाळ करू नको असे समजावले म्हणून वाहक (कंडक्टर) ला मारहाण करत रक्तबांबाळ करण्याचा प्रकार मालाडमध्ये घडला. या विरोधात त्यांनी मालाड पोलिसात धाव घेत निखिल अमन सिंग (२०) नावाच्या तरुणा विरोधात गुन्हा दाखल करवला आहे.

जखमी वाहक शशिकांत डगळे (३९) हे बेस्ट मुंबई या ठिकाणी काम करतात. त्यांच्या तक्रारीनुसार ते ३० डिसेंबर रोजी रूट क्रमांक ७२० वर मालवणी ते भाईंदर असा कामाचा रूट संपवून ते दुपारी कुरारला असलेल्या त्यांच्या घराच्या दिशेने निघाले. त्यांनी बस क्रमांक २७३ ही मालवणीवरून मालाड रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी पकडली. ही बस संध्याकाळी ४.३० च्या सुमारास मार्वे रोड जंक्शन सिग्नल, एस व्ही रोड परिसरात आली. त्याच दरम्यान सिंग हा बस चालक रशीद शेख यांच्यासोबत बस थांबवा, मला बस मधून उतरू द्या असे म्हणून वाद घालू लागला. त्यावर डगळे यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला त्यावर सिंगने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तू शिवीगाळ करू नको असे समजावल्यावर त्यांनी त्याच्या हातातील कड्याने डगळे यांच्या डोक्यावर हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले शताब्दी रुग्णालयात त्यांनी धाव घेतली. याची माहिती मालाड पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३२४,५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.