Join us

मुलगा बलात्काराच्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्याच बनाव; वडिलांचे खाते रिकामे

By मनीषा म्हात्रे | Updated: January 22, 2024 18:28 IST

घाटकोपर पूर्वेकडील पंतनगर परिसरात ५५ वर्षीय तक्रारदार राहण्यास आहे. ते स्वयंपाकी आहेत.

मुंबई : मुलाला बलात्काराच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले असून, त्याच्या सुटकेसाठी सुटका करायची असेल तर लगेच पैसे पाठवा अशी भीती घालून सायबर भामटयाने वडिलांचे खाते रिकामे केल्याची घटना घाटकोपरमध्ये समोर आली आहे. यामध्ये एकूण सव्वा लाखाची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवत, पंतनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. 

घाटकोपर पूर्वेकडील पंतनगर परिसरात ५५ वर्षीय तक्रारदार राहण्यास आहे. ते स्वयंपाकी आहेत. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून त्यांना कॉल आला. कॉल करणाऱ्याने 

 "तुम्हारे बेटेने बलात्कार किया है, उसको चौकी मैं बंद किया है, उसको छुडाना चाहते हो तो तुरंत पैसा भेज दो" असे बोलल्यानंतर ते घाबरले. तक्रारदार घाबरल्याचे लक्षात येताच सायबर भामट्याकडून कॉल सुरूच होते. त्याने ४ लाखांची मागणी केली. त्यांनी बँकेतील जमा रक्कमेसह मालकाकडून काही पैसे उचलून एकूण सव्वा लाख रुपये पाठवले. पैसे पाठवल्यानंतर ते घरी आले. मुलालाही फोन करून घरी बोलावले. मुलगा घरी आल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा  त्याने कोणताही बलात्कार केला नसून त्याला पोलिसांनीही पकडले नसल्याचे सांगताच त्यांना धक्का बसला.  फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

टॅग्स :सायबर क्राइममुंबई