Join us

मुंबईतील समुद्रकिनारा ठरतोय प्रेमाचा कोपरा!

By स्नेहा मोरे | Updated: February 14, 2024 09:50 IST

मुंबई  मागील काही वर्षांत मुंबईचे हृदय मोठे झाले, तसे मुंबईतील घरांचे आकार अधिकाधिक लहान झाले आहेत.

स्नेहा मोरे,मुंबई  :मुंबई  मागील काही वर्षांत मुंबईचे हृदय मोठे झाले, तसे मुंबईतील घरांचे आकार अधिकाधिक लहान झाले आहेत. गेल्या काही वर्षांत दहा बाय दहाच्या खोलीत प्रेमीयुगुलांना निवांतपणा, प्रेम व्यक्त करण्यासाठी हक्काचा कोपराही मिळत नाहीय. मग अशा सर्वांसाठी मुंबई शहर उपनगरातील समुद्र किनारेच आधार होऊ लागलेत. अगदी बँडस्टँड, जुहू चौपाटी, नरिमन पॉइंट, मरीन लाइन्स, आक्सा बीच, वरळी सी फेस, प्रियदर्शनी पार्क, कुलाबा, दांडी, अशा सर्वच ठिकाणी वीकेंड्स असो वा व्हॅलेंटाइनला असंख्य प्रेमीयुगुल आपला निवांत वेळ शोधत येतात. 

मुंबईत जागोजागी असलेली गर्दी, खच्चून भरलेल्या गाड्या, ऑफिस या सगळ्या गोतावळ्यातून असंख्य विवाहित जोडपीही आयुष्यातील अनेक चढ- उतार, यशापयश अन् हितगूज साधण्यासाठी हाच हक्काचा कोपरा निवडतात.  असंख्य प्रेमाच्या व्यक्त- अव्यक्त भावभावना ऐकून घेणारे हे समुद्र किनारे जणू काही या सर्वांच्या कुटुंबातल्या हक्काच्या माणसाची जागाच भरून काढतात.

काही वर्षांत मुंबईकरांची नजर या तरुण पिढीतील भावनिक आणि मानसिक घुसमटीला सरावली आहे, अनेकदा या जागांवर विसावा घेणारी मंडळी समुद्र किनाऱ्यांवर आपल्या दुःखाशी गाठ घेऊन, मन हलकं करून पुन्हा नव्या उमेदीने जगाशी लढण्यासाठी परततात. 

शुभमंगलसाठीही धडपड... 

मुंबईमध्ये शेकडो जोडपी व्हॅलेंटाइन ‘डे’चा मुहूर्त साधत धूमधडाक्यात प्रेमाचा बार उडवला. व्हॅलेंटाइन ‘डे’ म्हणजे जागतिक प्रेम दिन याच दिवशी विवाह बंधनात अडकण्याची प्रेमीयुगुलांची नेहमी धडपडत पाहण्यास मिळते. वांद्रे येथील विविध मंदिरांत मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासूनच ही जोडपी आपल्या वऱ्हाडी मंडळींसह विवाह सोहळ्यासाठी येतात.  मुंबईत विशेष करून वांद्रे येथे पूर्व, पश्चिम दोन्ही ठिकाणी असलेल्या विविध मंदिरांमध्ये ही जोडपी विवाह बंधनात अडकतात. म्हणूनच आजच्या दिवशी पुजरी, वकिलांना सुद्धा मोठी मागणी असते.

कुटुंबातल्या हक्काच्या माणसाची जागा :

 व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्याचे मनसुबे मनात बाळगून शेकडो प्रेमीयुगुल या समुद्र किनाऱ्यांवर जमतात. मुंबईतील या समुद्र किनाऱ्यांनी असंख्य प्रेमीयुगुलांची स्वप्न, सहवास आणि सोबत अनेक वर्षांपासून केलीय, त्यामुळे मागील दोन पिढ्यांच्या आयुष्यभर सुख- दुःखात सहभागी होण्याच्या आणाभाका या समुद्र किनाऱ्यांच्या साक्षीने झालेल्या दिसून येतात. 

 आजही साठीतील अनेक जण अगदी हात हातात घेऊन समुद्र किनारी बसून आयुष्यभर वेचलेल्या आठवणींचा कोपरा संवाद अन् सहवासातून जागवितात. त्यामुळे अशा असंख्य प्रेमाच्या व्यक्त- अव्यक्त भावभावना ऐकून घेणारे हे समुद्र किनारे जणू काही या सर्वांच्या कुटुंबातल्या हक्काच्या माणसाची जागाच भरून काढतात.

टॅग्स :मुंबईसागरी महामार्ग