Join us  

हुबेहूब एटीएम कार्डवाली टोळी आली आहे! कांदिवलीनंतर मालाडमध्ये गंडा; अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 1:19 PM

मदतीच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणारी टोळी उपनगरात सक्रिय असून पैसे काढण्यासाठी अनोळखी व्यक्तीची मदत घेणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

मुंबई : एटीएम कार्ड बदलून बँक खात्यातून पैसे काढून फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. ओशिवरा, कांदिवली परिसरात अशा प्रकारे गंडा घातल्यानंतर मालाडमध्येही हुबेहूब एटीएम कार्ड हातात ठेवत एका व्यक्तीला लुबाडण्यात आले. त्याच्याविरोधात मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मदतीच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणारी टोळी उपनगरात सक्रिय असून पैसे काढण्यासाठी अनोळखी व्यक्तीची मदत घेणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

कृष्णकांत सिंग (३८) यांच्या तक्रारीनुसार, ते १ मार्चला दुपारी मालाड रेल्वे स्थानकाजवळील एका एटीएम केंद्रात पैसे काढत असताना एका व्यक्तीने त्यांना मागून धक्का देत लवकर पैसे काढ, मलाही पैसे काढायचे आहेत, असे सांगितले. यावेळी सिंग यांनी चुकीचा पिन क्रमांक दाबल्याने पैसे निघाले नाहीत. तेव्हा त्या व्यक्तीने त्यांचे एटीएम कार्ड मशिनमधून काढून मी प्रयत्न करतो, असे सांगत त्यांना पिन क्रमांक विचारला. सिंग यांनी सांगितलेला पिन क्रमांक त्याने टाइप केला, मात्र पैसे आले नाहीत. त्यामुळे एटीएममध्ये पैसे नाहीत, असे सांगत डेबिट कार्ड सिंग यांच्या हातात ठेवून ती व्यक्ती निघून गेली. त्यानंतर सिंग यांनी सेंट्रल बँकेच्या ‘एटीएम’मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते डेबिट कार्ड आपले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

मात्र ते दिसायला हुबेहूब त्यांच्या एटीएम कार्डप्रमाणेच होते. त्यामुळे ही बाब तेव्हा त्यांच्या लक्षात आली नाही. मात्र, काही वेळाने त्यांच्या बँक खात्यातून सात हजार रुपये काढल्याचा मेसेज त्यांना आला. 

बँकरची फसवणूक-   युनियन बँक ऑफ इंडियाच्या कांदिवली पश्चिम शाखेतील कॅशिअर अनिल चव्हाण (५५) यांचेही एटीएम कार्ड दोन भामट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवत बदलले. -   चव्हाण यांना त्यांनी मदत करत असल्याचे भासवले. मात्र, नंतर बदललेल्या कार्डमधून पैसे आणि वस्तू खरेदी करून जवळपास ५८ हजारांची फसवणूक केली.

आरोपीने डोक्यावर टोपी, हेल्मेट तसेच तोंडाला रूमाल गुंडाळला होता. तसेच त्या एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरेही काम करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एटीएम केंद्राबाहेरील सीसीटीव्ही पोलिसांनी पडताळले असता आरोपी हा साधारण ४० वर्षांचा असल्याचा अंदाज त्यांनी बांधला आहे.

गृहिणीला गंडाओशिवरा पोलिसांच्या हद्दीत एटीएम केंद्रात पैसे काढायला गेलेल्या माधुरी यादव (३८) यांचे एटीएम कार्ड बदलून त्यांच्या खात्यातून २५ हजार काढण्यात आले. त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने हा प्रकार केला गेला. 

टॅग्स :एटीएमधोकेबाजी