मुंबई: अमिताभ बच्चनच्या जलसा बंगल्या जवळ मोटर सायकलवरून आलेल्या दोघांनी एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी जुहू पोलिसांनी आरोपीची पांढरी पॅन्ट आणि गाडीचा पिवळा रंग यावरून त्यांच्या मुसक्या आवळत तीन चोरीचे फोन, गाडीही हस्तगत केली. आरोपींवर मुंबई व पुणे मिळून १२ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
आरोपी मोहसीन लीक अन्सारी उर्फ चिकना (२०) आणि एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले जे गोवंडीचे राहणारे आहेत. परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय आणि जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय धोत्रे, गणेश जैन, उपनिरीक्षक तोडणकर आणि पथकाने सीसीटीव्हीच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू केला. त्यात तक्रारदाराच्या गळ्यातील मोबाईल खेचून भरधाव वेगाने जाणारा आरोपी दिसला. त्यात गाडीचा पिवळा रंग आणि मागे बसलेल्या व्यक्तीची सफेद रंगाची पॅन्ट दिसत होती. पोलिसांनी पुढील कॅमेरे चेक केले असता गाडी वांद्रे मार्गे, धारावी, कुर्ला, अमर महल जंक्शन चेंबूर रेल्वे स्टेशन , नीलम जंक्शन पर्यंत गेली. तिथे १ आरोपी उतरला तर दुसरा आरोपी हा देवनार पोलीस स्टेशनहून पुढे शिवाजीनगर ब्रिज, पी एम जी पी कॉलनी, मानखुर्द रेल्वे स्टेशन मार्गे बी ये आर सी मेन गेट येथून ट्रॉम्बे पोलीस स्टेशन मार्गे चिंता कॅम्प येथे जाताना दिसला. जवळपास दीडशे ते दोनशे सीसीटीव्ही फुटेज पडताळत पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. जुहूसह धारावी, काळाचौकी, नौपाडा ,गोवंडी, ट्रॉम्बे, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड, हिंजवडी, मानखुर्द, टिळक नगर पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असून अद्याप जवळपास दीड लाख रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे.