Join us

डिसेंबरमध्ये होणार थर्ड आय आशियाई महोत्सव, यंदाचे २०वे वर्ष

By संजय घावरे | Updated: October 9, 2023 21:11 IST

महोत्सवासाठी प्रवेशिका पाठवण्याची प्रक्रिया सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एशियन फिल्म फाऊंडेशनतर्फे आयोजित केला जाणारा थर्ड आय आशियाई महोत्सव यंदा डिसेंबरमध्ये संपन्न होणार आहे. २००२ मध्ये सुरु झालेल्या या महोत्सवाचे यंदा २० वे वर्ष आहे. सध्या या महोत्सवासाठी प्रवेशिका पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मुंबई आणि ठाणे परिसरातील चित्रपट रसिकांसाठी आशिया खंडातील समकालीन चित्रपट पाहण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून चित्रपट रसिकांना मिळत असते. अशा प्रकारचा हा एकमेव चित्रपट महोत्सव आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहयोगाने संपन्न होणाऱ्या या महोत्सवाला प्रभात चित्र मंडळाचे विशेष सहकार्य लाभते. या महोत्सवात जपान, इराण, बांगलादेश, श्रीलंका अशा विविध आशियायी देशांमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. या महोत्सवात यावेळी समकालीन भारतीय प्रादेशिक चित्रपट आणि समकालीन मराठी चित्रपट अशा दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ऑगस्ट २०२२ नंतर निर्मिती करण्यात आलेले प्रादेशिक आणि मराठी चित्रपट या स्पर्धांसाठी अर्ज करू शकतात. स्पर्धकांना महोत्सवाच्या संकेतस्थळावर प्रवेशिका भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दोन स्पर्धा विभागांबरोबर एशिअन स्पेक्ट्रम, मृणाल सेन यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या चित्रपटाचे सिंहावलोकन हे विभागही या महोत्सवात असणार आहेत.

महोत्सवा दरम्यान परीक्षकांनी निवडलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्रींना पुरस्कार देण्यात येणार असून एशियन कल्चर अवार्ड, सत्यजित राय स्मृती पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट समीक्षकाला स्वर्गीय सुधीर नांदगावकर पुरस्कारदेखील देण्यात येणार आहेत.

टॅग्स :मुंबई