Join us

25 वर्षांनी  रखडलेला ठाकूर कॉलेज समोरील 100 मिटरचा रस्ता झाला तयार!

By मनोहर कुंभेजकर | Updated: February 4, 2024 12:08 IST

रस्त्याच्या दयनीय अवस्थेने मुलगी द्यायला तयार नव्हते वधू पक्ष!

मुंबई-मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील कांदिवली (पूर्व) प्रभाग क्रमांक २६ येथील ठाकूर कॉलेज समोरून ते सिंग इस्टेट रोड क्र. 1 पर्यंतच्या रस्त्याची अवस्था मागील २५ वर्षे न्यायालयीन प्रक्रियेमुळे दयनीय झाली होती.येथील रस्त्याचे रुपडे पालटण्यासाठी मागाठाणे  विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी प्रशासनाशी पाठपुरावा केला होता.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येवून सुर्वे यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक २६ सिंग ईस्टेट रोड क्र.१ हा गेली २५ वर्ष रखडलेला रस्ता बनविण्यात आला.

या रस्त्याचे लोकार्पण आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शाखाप्रमुख सचिन केळकर,शाखाप्रमुख  हेमलता नायडू, बापूराव चव्हाण, राजा जाधव, राजकुमार जाधव,बबलू चंडालिया, सिंग इस्टेट रहिवासी संघाचे सेक्रेटरी पांडुरंग धायगुडे सर आणि पदाधिकारी आणि येथील नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

रस्त्याच्या दयनीय अवस्थेने मुलगी द्यायला तयार नव्हते वधू पक्ष!

सचिन केळकर यांनी सांगितले की,100 मीटरच्या ठाकूर महा विद्यालयाच्या समोरील या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय होती की,येथील मुलांसाठी ठिकाण बघायला येणारे वधू पक्ष त्यांची मुलगी देण्यास तयार होत नव्हते.आमदार सुर्वे यांनी सदर प्रकरणी यशस्वी तोडगा काढल्यावर अखेर 25 वर्षांनी 100 मीटरचा रस्ता तयार झाल्यावर येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.