Join us  

ती बोट पाकिस्तानची नाही, भारताचीच; ओएनजीसीजवळ पकडलेल्या बोटीवर खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 3:35 PM

सदरची बोट ही मासेमारीसाठी गेली असून ती संपर्काबाहेर असल्याने तिच्या अलीकडे असणाऱ्या निर्गम या बोटीवरून जलराणी बोटीशी संपर्क साधण्यात आला होता. 

मुंबई आणि पालघर किनारपट्टी पासून ४४ नॉटीकल मैलावर तटरक्षक दलाने पकडलेल्या बोटीत कोणीही पाकिस्तानी खलाशी नाहीत. हा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचा खुलासा या बोटीला अर्थसाहाय्य करणाऱ्या उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने केला आहे. सदरची जलराणी ही बोट उत्तन मधील बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची असून दोन वर्षांपूर्वी तिला उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत अर्थसाहाय्य केले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष लिओ कॉलासो यांनी दिली आहे. 

दूरदर्शनला याची माहिती देण्यात आली आहे. आज सकाळी ही बोट तटरक्षक दलाच्या जवानांनी त्यात पाकिस्तानी नागरिक असल्याच्या संशयावरून पकडली होती, मात्र यातील सर्वच्या सर्व पंधरा खलाशांची आधार कार्ड आमच्याकडे असून त्यात कोणीही पाकिस्तानी नागरिक नाही, असे कोलासो यांनी सांगितले. सदरची बोट ही मासेमारीसाठी गेली असून ती संपर्काबाहेर असल्याने तिच्या अलीकडे असणाऱ्या निर्गम या बोटीवरून जलराणी बोटीशी संपर्क साधण्यात आला होता. उत्तन किनारी तिने परतावे अशा सूचना दिल्या गेल्या आहेत, असे कोलासो यांनी सांगितलं.

ही बोट मासेमारीसाठी सुमारे साडेचार किलोमीटर क्षेत्रात जाळे टाकून असल्याने ते गुंडाळून घ्यायला पाच तास आणि परत येण्यासाठी किमान दोन आणखी तास लागतील असे ही लिओ कोलासो यांनी दूरदर्शनला सांगितले.

टॅग्स :ओएनजीसी