Join us  

वेसावकरांनी मानले मुख्यमंत्र्यांचे व आमदार भारती लव्हेकर यांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 6:28 PM

स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावलीमुळे मुंबईतील 34 कोळीवाड्यांचे आता सीमांकन होणार असून याचा फायदा मुंबईतील सुमारे 5 लाख कोळीबांधवांना होणार आहे.  मुंबईच्या विकास आराखड्यास मार्च अखेर मान्यता देण्यात येईल.

- मनोहर कुंभेजकर!

मुंबई : स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावलीमुळे मुंबईतील 34 कोळीवाड्यांचे आता सीमांकन होणार असून याचा फायदा मुंबईतील सुमारे 5 लाख कोळीबांधवांना होणार आहे.  मुंबईच्या विकास आराखड्यास मार्च अखेर मान्यता देण्यात येईल. कोळीवाडे, गावठाण आणि आदिवासी पाड्यांसाठी नवीन स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली(डीसीआर) तयार करण्यात येत आहे अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत दिली होती. नियम 293 अन्वये मुंबईचा विकास या विषयावर विविध आमदारांनी चर्चा उपस्थित केली होती.त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

या महत्वाच्या निर्णयामुळे मुंबईतील 34 कोळीवाडे आणि 85 गावठाणे यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याप्रकरणी वर्सोवा विधानसभेच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी गेली 3 वर्षे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे आता याची लवकरच अंमलबजावणी होणार असल्यामुळे वेसावकरांनीे मुख्यमंत्र्यांचे व आमदार डॉ.भारती लव्हेकर यांचे खास आभार मानले आहेत. मुंबईतील मूळ निवासी असलेले कोळी,आदिवासी बांधव यांच्या गावठाणांचे आणि आदिवासी पाड्यांचे सीमांकन केले जात आहे. त्यात जर काही गावठाण, आदिवासी पाडे सुटले तर मुंबई महापालिका आयुक्तांना प्राधिकृत करण्यात आले आहे. गावठाण,कोळीवाडे, आदिवासी पाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यात येत आहे.मार्चमध्ये विकास आराखडा व्हावा यासाठी प्रयत्न केले जात असून यात कुठलीही दिरंगाई नाही,असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले होतेे.

येथील वर्सोव्याच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी कोळीवाड्यांचे नवीन विकास आराखड्यात स्वतंत्र सीमांकन करावे यासाठी त्यांनी येथून 2014 साली आमदार म्हणून निवडून आल्यावर सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे व विधानसभेत पाठपुरावा केला होता. गेली 3 वर्षे आमदार डॉ.लव्हेकर यांनी आयोजित वर्सोवा महोत्सवाला मुख्यमंत्री जातीने येथे उदघाटक म्हणून उपस्थित होते.आणि यावेळी येथील कोळी बांधवांची असलेली संस्कृती टिकवून ठेवून कोळीवाड्यांचे अस्तित्व कायम टिकण्यासासाठी नव्या विकास आराखड्यात त्यांचा समावेश करून त्यांचे सीमांकन करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले होते अशी माहिती भाजपाच्या वर्सोवा विधानसभेचे सरचिटणीस पंकज भावे यांनी दिली. या निर्णयामुळे वेसावकरांच्या आनंदाला उधाण आले असून वर्सोवा विधानसभेत ठिकठिकाणी मुख्यमंत्री व आमदार डॉ.भारती लव्हेकर यांच्या अभिनंदनाचे फलक लागले असल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनाचे सकारात्मक पडसाद वेसावे कोळीवाड्यात उमटले आहेत.केरळ नंतर मासेमारीत देशात दुसरा क्रमांक वेसावे कोळीवाड्याचा लागतो.येथील लोकसंख्या सुमारे 20 हजार असून आमची कुटुंब मोठी झाली.मासेमारी हा आमचा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आहे.त्यामुळे कोळीवाडा सोडून आम्ही दुसरीकडे जाऊ शकत नाही.आमची घरे आम्हाला दुरुस्त करता येत नव्हती. घरे दुरुस्त केल्यावर पालिका अधिकारी त्यावर तोडक कारवाई करतात.मात्र आमच्या आमदार डॉ.लव्हेकर यांनी गेली 3 वर्षे कोळीवाड्याच्या सीमांकान व विकासासाठी केलेले सातत्याने प्रयत्न आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका आणि विधानसभेत सीमांकनाचे दिलेले आश्वासन यामुळे खऱ्या अर्थाने वेसाव्यासह मुंबईतील 34 कोळीवाडे आणि 85 गावठाणातील राहणाऱ्या मूळ नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार असल्याचे वेसावा नाखवा मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र काळे व उपाध्यक्ष पराग भावे यांनी सांगितले.कोळीवाडे आणि गावठणे यांच्यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावलीची मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून आमची कुटुंबे मोठी झाल्यामुळे कोळी बांधवांनी ही नियमावली लागू करण्यापूर्वी त्यांनी केलेली वाढीव  बांधकामे देखिल अधिकृत करण्यासाठी एम आर टी पी कायद्यात बदल करावा अशी आग्रही मागणी वेसावा कोळी जमातीचे अध्यक्ष पंकज जोनचा व प्रवीण भावे यांनी केली आहे.लवकरच वेसावकरांच्या वतीने मुख्यमंत्री व आमदार डॉ.लव्हेकर यांचा जाहिर सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :भारती लव्हेकरदेवेंद्र फडणवीसमुंबई