Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकर...विसरलेल्या तलावांचा जिर्णोद्धार कर

By admin | Updated: September 24, 2015 00:04 IST

पूर्वी ठाण्याची ओळख ही तलावांचे शहर म्हणूनच होती. आज ती पुसट होते आहे. शहरात असलेल्या ६५पैकी आजच्या घडीला केवळ ३५ तलावच शिल्लक आहेत

अजित मांडके, ठाणेपूर्वी ठाण्याची ओळख ही तलावांचे शहर म्हणूनच होती. आज ती पुसट होते आहे. शहरात असलेल्या ६५पैकी आजच्या घडीला केवळ ३५ तलावच शिल्लक आहेत. परंतु, त्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच तलावांवर पालिका दरवर्षी लाखोंचा निधी खर्च करत आहे. उर्वरित तलावांच्या अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. काहींना झोपडपट्टीचा विळखा आहे, तर काही तलावांचा आकार कमी झाला आहे. तर काही तलाव हे बुजण्याच्या मार्गावर असून काहींच्या प्रदूषणाची पातळी वाढत आहे. त्यामुळेच आता शहरात जेवढे तलाव शिल्लक राहिले आहेत, किमान त्या तलावांचा जिर्णोद्धार करुन ठाणेकरांसाठी ते पिकनिक स्पॉटसाठी अथवा विरंगुळ्यासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी लोकमतने मोहीम उभारली आहे. ‘काहीतरी कर ठाणेकर’ या टॅग लाईनखाली तलावांचा जीर्णोद्धार सगळ््यांच्या सहकार्याने करण्याचे अभियान ‘लोकमत’ने हाती घेतले असून त्याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे.ठाणे आणि तलाव हे एक अनोखे नाते या शहराचे पूर्वी होते. परंतु आता हीच ओळख काहीशी पुसली जात असून ठाण्याची चौपाटी म्हणून जाणारा मासुंदा तलाव काहीसा चांगला वाटत असला तरी त्याला उंदरांनी पोखरुन काढले आहे. सायंकाळच्या सुमारास टव्वाळ पोरांबरोबर, प्रेमीयुगलांच्या चाळ््यांना सामोरे जावे लागत आहे. या खालोखाल, आंबेघोसाळे आणि कोलबाड भागातील ब्रम्हाळा तलावाची अवस्थाही तशीच आहे. या पाचच तलावांवर पालिका दर वर्षी लाखों रुपयांचा निधी खर्च करीत आहे. परंतु, उर्वरित तलावांची अवस्था ही या तलावांहूनही अतिशय दयनीय आहे. ते प्रदूषित होणार नाहीत, याची यथा तथा काळजी पालिका घेते. परंतु, त्यांची निगा, देखभाल फारशी होतांना दिसत नाही. उथळसर भागात पूर्वी असलेल्या तलावाच्या जागेवर आज पालिकेचे प्रभाग समिती कार्यालय उभे राहिले आहे. त्यामुळेच आता केवळ पाच तलावांवर लक्ष न देता, पालिकेने आणि राजकीय पुढाऱ्यांसह सामाजिक संघटनांनी शहरातील उर्वरित ३० तलावांकडेही लक्ष देऊन हे तलाव विकसित करावेत हाच या मोहिमे मागचा उद्देश असून तो सफल करण्यासाठी ठाणेकरांनी पुढाकार घ्यावा आणि विसरलेल्या तलावांचा जिर्णोद्धार कर म्हणून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन या माध्यामातून करण्यात आले आहे.