Join us

ठाण्यातील पाणी साचण्याची ठिकाणे घटली

By admin | Updated: June 15, 2014 23:51 IST

अखेर पावसाने ठाण्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, पालिकेनेसुद्धा आपली कंबर कसली असून मान्सूनच्या काळात कुठेही पाणी साचू नये, यासाठी पालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत

ठाणे : अखेर पावसाने ठाण्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, पालिकेनेसुद्धा आपली कंबर कसली असून मान्सूनच्या काळात कुठेही पाणी साचू नये, यासाठी पालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच फायदा म्हणून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शहरात पाणी तुंबण्याच्या ठिकाणांमध्ये घट झाली आहे. तीन वर्षांपूर्वी शहरात २६ ठिकाणे पाणी तुंबण्याची होती. यंदा ही संख्या १४ वर आली आहे. तसेच २६ ठिकाणी भूस्खलन किंवा दरडी कोसळण्याच्या घटना घडू शकतात, असे महापालिकेने स्पष्ट केले असून येथील रहिवाशांना सतर्कतच्या सूचना दिल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या हद्दीत नऊ प्रभाग समिती अंतर्गत पावसाळ्यात येणाऱ्या विविध आपत्तींचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने योग्य ती उपाययोजना करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रत्येक प्रभाग समितीत किती सखल भाग आहेत, जिथे पाणी साचू शकते, याची एक यादी महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आली आहे. तसेच कुठे भूस्खलन होईल, कुठे दरड कोसळेल, अशी ठिकाणेही महापालिकेने जाहीर केली आहेत. त्यानुसार, नौपाडा प्रभाग समितीत सर्वाधिक आठ ठिकाणी सखल भाग आहेत, तिथे पाणी साचू शकते तर उथळसर आणि मानपाडा-माजिवडा येथे दोन-दोन ठिकाणी तर कळवा-मुंब्रा येथे प्रत्येकी एकेक सखल भाग असून येथे पाणी साचू शकते, तर कोपरी, वागळे, रायलादेवी, वर्तकनगर या प्रभाग समिती अंतर्गत एकाही ठिकाणी सखल भाग नसल्याचे महापालिकेने जाहीर केलेल्या यादीत स्पष्ट केले आहे. रायलादेवी प्रभाग समिती अंतर्गत तब्बल १२ ठिकाणी भूस्खलनाचा धोका वर्तवण्यात आला आहे, तर कळवा येथे सहा, मुंब्य्रात पाच मानपाडा-माजिवडा दोन आणि वर्तकनगर येथे एका ठिकाणी भूस्खलनाची ठिकाणे महपालिकेने जाहीर केली आहेत. ठाणे महापालिकेने सर्व्हिस लेव्हल बेंचमार्कनुसार चार तासांपेक्षा जास्त कालावधीकरिता सहा इंचांपेक्षा जास्त पाणी वारंवार साचत असल्यास त्या भागास पाणी सखल भाग म्हणून गृहीत धरले आहे. पावसाळ्यात ठाणे महापालिकेच्या हद्दीत कुठेही आपत्ती उद्भवल्यास पालिका सज्ज आहे.