Join us

ठाण्यात मनसेला पडले खिंडार

By admin | Updated: January 20, 2015 02:08 IST

मनसेचे माजी शहराध्यक्ष नीलेश चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून ५३ मनसैनिकांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन आपल्या पदांचे राजीनामे श्रेष्ठींकडे धाडले आहेत.

ठाणे : मनसेचे माजी शहराध्यक्ष नीलेश चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून ५३ मनसैनिकांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन आपल्या पदांचे राजीनामे श्रेष्ठींकडे धाडले आहेत. त्यामुळे ठाण्यातील मनसेला खिंडार पडले आहे. शहर सचिव, सहसचिव, वाहतूक सेना शहराध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष यांचा त्यात समावेश आहे. दोनच दिवसांपूर्वी चव्हाण यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागेवर अविनाश जाधव यांची वर्णी लावण्यात आली. त्यामुळे चव्हाण यांनी सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर, आता ५३ मनसैनिकांनीदेखील आपल्या पदांसह पक्षालादेखील सोडचिठ्ठी दिली आहे. मागील डिसेंबर महिन्यात आपण ठाण्यातील पदाधिकाऱ्यांसह चर्चा करण्यासाठी येणार होतात. परंतु, आला नाहीत. त्यानंतर, अचानक आपण शहराध्यक्ष बदलला. परंतु, या वेळीदेखील पक्षातील एकाही पदाधिकाऱ्याला चर्चेत न घेता हा निर्णय घेतल्याने आम्ही आपल्या पदांचा आणि पक्षाचाही राजीनामा देत असल्याचे पत्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना धाडले आहे. यामध्ये शहर सचिव जनार्दन खेतले, वसंत गवाळे, वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष अफाक इक्बाल शेख, वाहतूक सेनेचे उपशाखाध्यक्ष अमोल कुचेकर यांच्यासह १४ शाखाध्यक्ष, ११ उपशाखाध्यक्ष यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. (प्रतिनिधी)