मुंबई : अच्छाड सीमा तपासणी नाक्यांवर चालणारे गैरप्रकार धाड टाकून रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर ठाण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी एम. बी. जाधव यांना शासनाने निलंबित केले आहे. ‘लोकमत’ने हे प्रकरण उघडकीस आणले होते. अच्छाड टोलनाक्यावर परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी साध्या वेषात ट्रकमध्ये जाऊन छापा टाकला होता. त्या वेळी तेथे कामावर असणारे आरटीओ पळून गेले होते. अच्छाड हा सीमा तपासणी नाका महाराष्ट्र-गुजरात सीमेवर आहे. या दोन नाक्यांमध्ये अर्धा ते एक किलोमीटरचे अंतर आहे. मात्र दोन्ही नाक्यांवर जमा होणाऱ्या रकमेत मोठी तफावत आढळली होती. मालवाहू वाहने वजन केल्याशिवाय व कोणत्याही तपासणीशिवाय जाऊ दिली जात होती. हा तपासणी नाका तांत्रिक बाबीवर चालत नसल्याने तसेच वाहनांच्या वजन करण्यामागील त्रुटींवर त्या नाक्यावरील अधिकारी आक्षेप घेत नव्हते. ओव्हरलोड ट्रकमधील माल उतरवून घेणे आणि तो पुन्हा नवीन वाहनात चढविण्यासाठी नियमाप्रमाणे दर न लावणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय नियंत्रण न ठेवणे असे आक्षेप एम. बी. जाधव यांच्यावर ठेवण्यात आले होते. हा सगळा अहवाल आयुक्त झगडे यांनी प्रधान सचिव गौतम चटर्जी यांच्याकडे पाठविला. त्यांनी निलंबनाची शिफारस करीत तो अहवाल परिवहन मंत्र्यांकडे पाठविला. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर परिवहन विभागाचे कार्यासन अधिकारी मो. बा. तासीलदार यांनी निलंबनाचे आदेश जारी केले. हे आदेश निघाल्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी या निर्णयाविरुद्ध सह्यांची मोहीम राबविणे सुरू करून मंत्री आणि सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. (विशेष प्रतिनिधी)
ठाण्याचे आरटीओ निलंबित
By admin | Updated: April 26, 2015 02:02 IST