ठाणे : पु.ल. देशपांडे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून अभिनय कट्ट्यावर पु.ल. एक आठवण, या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात त्यांच्या संपूर्ण जीवनाचा आढावा घेण्यात आला. तसेच त्यांच्या काही आठवणीही या वेळी सांगण्यात आल्या.या वेळी पु.लं.नी लिहिलेल्या व्यक्ती आणि वल्ली, वाऱ्यावरची वरात यामधील सखाराम गटणे, नामू परीट, बबडू, नारायण, चितळे मास्तर आदी अजरामर व्यक्तिरेखा अभिनय कट्ट्यावरील कलाकारांनी साकारल्या. प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या देवबाप्पा या चित्रपटातील नाच रे मोरा नाच... या गाण्यावर रूपेश बने याने नृत्य सादर केले. भक्ती बर्वेंनी सादर केलेल्या तुला शिकवीन चांगलाच धडा... हा ती फुलराणी नाटकातील प्रवेशही येथे दाखविण्यात आला. त्यानंतर, सुशांत महाजनलिखित आणि दिग्दर्शित अभ्यास साहित्यिकांचा या विषयावरील स्क्रिप्ट सादर करण्यात आली. यामध्ये एका कलाकाराला साहित्यिकांचा अभ्यास करणे किती गरजेचे असते, हे दाखविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी कट्ट्याचे अध्यक्ष किरण नाकती यांनी प्रेक्षकांशी व कलाकारांशी संवाद साधून उत्तम कलाकार होण्यासाठी साहित्यिकांचा अभ्यास करणे गरजेचे आहे, या विषयावर मार्गदर्शन केले.
ठाण्यात ‘पु.ल. एक आठवण’
By admin | Updated: June 15, 2015 23:32 IST