जितेंद्र कालेकर , ठाणेठाणे आणि पालघर जिल्हयातून तब्ब्ल २९० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह तीन मंत्री, १७ विद्यमान आमदार आणि ३ माजी आमदारही आपले राजकीय भवितव्य अजमावित आहेत. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात निवडणूक प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे.ठाण्याचे पालकमंत्री नाईक हे बेलापूरमधून राष्ट्रवादीतून निवडणूक लढवित आहेत. त्यांना पुतणे वैभव नाईक यांनी भाजपातून आव्हान दिले असून नवी मुंबईचे माजी महापालिका आयुक्त विजय नहाटा हे शिवसेनेतून त्यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड हेही राष्ट्रवादीतून कळवा मुंब्य्रातून उभे आहेत. त्यांना शिवसेनेचे उपनेते दशरथ पाटील यांच्यासह भाजपाचे अशोक भोईर, काँग्रेसचे यासीन कुरेशी आणि मनसेचे महेश साळवी तसेच आॅल इंडीया मजलीस इ इत्तेहदुल मुस्लमीनचे अशरफ मुलानी अशा पाच उमेदवारांशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. याशिवाय, विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचे चिरंजीव आणि आमदार निरंजन डावखरे हेही ठाणे शहरमधून राष्ट्रवादीतूनच उभे आहेत. त्यांची माजी आमदार भाजपाचे संजय केळकर, शिवसेनेचे रविंद्र फाटक, मनसेचे निलेश चव्हाण आणि कॉग्रेसचे नारायण पवार यांच्याशी लढत होणार आहे.
ठाणे, पालघरात ३ मंत्री, १७ आमदार रिंगणात
By admin | Updated: October 12, 2014 23:27 IST