Join us

ठाणे-पालघर जिल्ह्यांतील ४३ गावांना पुराचा धोका

By admin | Updated: July 2, 2015 22:41 IST

ठाणे व पालघर या जिल्ह्यांतील नियमित पुराचा धोका असलेल्या गावांची यादी ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केली आहे.

ठाणे : ठाणे व पालघर या जिल्ह्यांतील नियमित पुराचा धोका असलेल्या गावांची यादी ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केली आहे. त्यात, दोन्ही जिल्ह्यांतील पाच तालुक्यांमधील ४३ गावांचा समावेश असून त्यापैकी ३७ गावे ठाणे जिल्ह्यातील आहेत, तर पालघरातील अवघ्या दोन गावांचा समावेश आहे. तसेच पूरस्थिती ओढवल्यास स्थलांतर करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील समाजमंदिरे, जि.प.च्या शाळा, खासगी हॉटेल अशी ६५ ठिकाणे निश्चित करून एखाद्याने सहकार्य करण्यास नकार दिल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सूर्या, कुर्झेला पुराचा धोकाठाण्यातील शहापूर तालुक्यातील भातसा, वैतरणा, तानसा या नद्यांच्या काठांवर वसलेल्या भातसा, वासिंद, बोरशेती, सुचते, अंती, सरळांबा, केळ्याचापाडा, खुताडी, कासेगाव, सातिवली, सारशेत, शहापूर, गोठेघर, वापे, सावरोली, कुर्ड, डिंबा, वेधवई, आगई आणि माहोली तर मुरबाड तालुक्यातील काळू नदीच्या काठी बसलेल्या शेगव, नांदन, शीळ, शेलवली, वकोळे, खिरवली, मध, अंबर्जे आणि मासवण तसेच उल्हासनगर येथील बारवी नदीच्या काठावर बसलेल्या तोंडली, चिकणीपाडा, जांभूळपाडा, खानोल आणि चिंचूलपाडा या गावांना तसेच पालघरातील डहाणू येथील सूर्या आणि कालिंदा नदीवरील सावा, कुंज, किलवंडा व कालिंज तसेच तलासरीमधील कुर्झे नदीच्या किनारी असलेल्या कुर्झे गावाला पुराचा धोका आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यास आणि पूरस्थिती उद्भवल्यास तेथील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील समाजमंदिरे, जि.प.च्या शाळा, खासगी हॉटेल्स अशा ६५ ठिकाणांचा शोध घेतला आहे. जर एखाद्या संस्थेने अथवा खासगी हॉटेलचालकाने नकार दिल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. जयदत्त विसावे यांनी सांगितले. २६ जुलै २००५ रोजी झालेल्या पावसाचा तडाखा मुंबई व उपनगरांसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याला बसला होता. त्या वेळी विभाजनापूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील खाडी, नदीकिनारे आणि धरणाखालील सुमारे ६११ गावे बाधित झाली होती. त्यानुसार, यंदा नेहमीच पुराचा धोका असणाऱ्या गावांची यादी ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केली आहे. विशेष म्हणजे जिल्हा विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, तर पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर आणि तलासरी या तालुक्यांतील ४३ गावांचा समावेश आहे.