Join us

ठाणे महापालिका करणार वीजनिर्मितीसाठी सौरशेती

By admin | Updated: October 8, 2015 00:37 IST

महापालिकेने प्रभाग समिती कार्यालये, बीएसयूपीची घरे आणि इतर काही ठिकाणी सौरपॅनल उभारून विजेची बचत केल्यानंतर यापुढेही जाऊन त्यांनी वीजनिर्मितीसाठी सौरशेती करण्याचा

- अजित मांडके,  ठाणेमहापालिकेने प्रभाग समिती कार्यालये, बीएसयूपीची घरे आणि इतर काही ठिकाणी सौरपॅनल उभारून विजेची बचत केल्यानंतर यापुढेही जाऊन त्यांनी वीजनिर्मितीसाठी सौरशेती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, डायघर येथील डम्पिंग ग्राउंडच्या जागेत पहिला प्रयोग पालिका राबविणार असून येथील पाच एकर जागेत एक मेगावॅटचा म्हणजेच वार्षिक १५ लाख युनिट वीजनिर्मितीचा हा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पासाठी पालिका एकही पैसा खर्च करणार नसून तो खाजगी लोकसहभाग (पीपीपी) तत्त्वावर उभारला जाणार आहे.केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटीअंतर्गत ठाणे महापालिकेने विविध योजना हाती घेतल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून हा सौरशेतीचा प्रकल्प असून त्याचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये करण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. यापूर्वी महापालिका मुख्यालय, काही आरोग्य केंद्रे, विविध प्रभाग समिती कार्यालयांच्या ठिकाणी सौरपॅनल उभारून विजेची निर्मिती केली आहे. तर, बीएसयूपीच्या घरांवर सोलर वॉटर हीटर ही यंत्रणा बसविली आहे. त्यापासून पालिकेने वीजबचत केली आहे. परंतु, आता प्रायोगिक तत्त्वावर हा सौरशेती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातून वार्षिक १५ लाख युनिट एवढी वीजनिर्मिती होणार असून ती संबंधित संस्था इतर कंपन्यांना विकू शकणार आहे. एकही पैसा खर्च न करता पालिकेची तिजोरी भरणारपालिका केवळ संबंधित संस्थेला जागा देणार आहे. त्यामुळे एकही पैसा खर्च न करता पालिकेच्या तिजोरीत या माध्यमातून निधी उपलब्ध होणार आहे. येथील प्रकल्प यशस्वी झाल्यास पुढील टप्प्यात शहरातील पडीक मोकळ्या भूखंडांवरदेखील अतिक्रमण होऊ नये, म्हणून त्यांचा वापर यासाठी करण्याचा पालिकेचा मानस आहे.शिवाय, सिव्हरेज ट्रीटमेंट प्लँटच्या बाजूची जागा आणि इतर काही मोकळ्या भूखंडांवर अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्याचा पालिकेचा मानस आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाची प्रक्रिया पूर्ण झाली असून अनेकांनी तो उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.