Join us

ठाणे महापालिकेचा डोलारा सुधारला

By admin | Updated: April 2, 2015 00:23 IST

ठाणे महापालिकेची आर्थिक घडी एलबीटीमुळे विस्कटली होती. परंतु, आता आर्थिक वर्ष सरले असताना पालिकेच्या प्रमुख उत्पन्नाच्या स्रोतांनी ९४.९४ टक्क्यांची वसुली केली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेची आर्थिक घडी एलबीटीमुळे विस्कटली होती. परंतु, आता आर्थिक वर्ष सरले असताना पालिकेच्या प्रमुख उत्पन्नाच्या स्रोतांनी ९४.९४ टक्क्यांची वसुली केली आहे. एलबीटी, मालमत्ता आणि शहर विकास विभागाने वसुलीत विक्रम केला आहे. परंतु, पाणीपट्टी विभागाने मात्र पालिकेची निराशा केली आहे. पाणीपट्टीतून पालिकेला ६६.१५ टक्क्यांचे उत्पन्न मिळाले आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने उद्दिष्टाच्या पुढे जाऊन १४६.५० टक्क्यांची वसुली केली आहे. एकूणच विविध विभागांना १४३७ कोटींचे उद्दिष्ट असताना १३६४ कोटी ३५ लाख ३ हजारांची वसुली झाली आहे.ठाणे महापालिकेत एप्रिल २०१४ मध्ये एलबीटी लागू झाला. त्यानंतर, त्या विरोधात ठाण्यातील व्यापाऱ्यांनी एल्गार पुकारला होता. त्यामुळे तीन ते चार महिने पालिकेच्या तिजोरीत ठणठणाट होता. अखेर, तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी यावर तोडगा काढून व्यापाऱ्यांना एलबीटी भरण्यास प्रोत्साहित केले. त्यानंतर, हळूहळू का होईना, पालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारत गेली. परंतु, तरीदेखील काही वेळेस पालिकेच्या तिजोरीत कर्मचाऱ्यांचा पगार निघेल, एवढाही निधी शिल्लक नव्हता. त्यामुळे शहरातील विकासकामे रखडली. शिवाय, नवीन योजना कागदावरच राहिल्या. नगरसेवकांची कामे, प्रभागाची कामे आदींसह इतर कामांनाही ब्रेक लागला होता. परंतु, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वसुलीची गती वाढविली.