ठाणे : मागील १२ वर्षे कागदावर असलेला नळ कनेक्शन्सवर मीटर बसविण्याचा ठाणे महापालिकेचा प्रस्ताव अखेर २०१५ मध्ये प्रत्यक्षात अमलात येणार आहे. यानुसार, प्रशासनाने शहरातील १५ हजार २९० नळ कनेक्शनवर आता ईईसी मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे़ शहरातील वाणिज्य वापराच्या आणि नौपाडा, उथळसर, कोपरी, वागळे, रायलादेवी व कळवा प्रभाग समिती अंतर्गत २५ मिमीच्या व त्यावरील व्यासाच्या नळ कनेक्शनवर ती बसविली जाणार असून त्यावर १२ कोटी ६१ लाख, ७४ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. पालिकेने २००३ मध्ये सुरुवातीला हा प्रस्ताव आणला होता. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेने पुन्हा २००८-०९ च्या सुमारास नवा आॅटोमेटीक म्हणजेच एएमआर मीटर बसविण्यासंदर्भातील प्रस्ताव आणला. परंतु, याचा खर्च अधिक असल्याने त्याऐवजी कमी किमतीची आयएसओईईसी स्टॅण्डर्ड मल्टिजेट मीटर बसविण्याच्या सूचना केंद्र शासनाने केल्या होत्या. विशेष म्हणजे यासंदर्भात तीन वेळा निविदादेखील काढण्यात आल्या होत्या. परंतु, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर हा प्रस्ताव बासनात गुंडाळण्यात आला. अखेर, आता जेएनएनयूआरएमअंतर्गत ही मीटर्स बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सेमी आॅटोमेटीक असलेली ही मीटर्स आता बसविली जाणार आहेत. यानुसार, पहिल्या टप्प्यात व्यावसायिक (वाणिज्य) तसेच इमारतींसाठी असलेल्या २५ मिमी व त्यावरील व्यासाच्या घरगुती नळ कनेक्शन्सवर १५ ते ३०० मिमी व्यासाची ईईसी मीटर्स बसविण्यात येणार आहेत. त्यांची देखभाल, दुरुस्ती करणे व रीडिंग घेऊन बिल तयार करून वितरीत करण्यासंदर्भातील प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. याअंतर्गत मीटर बसविणे, त्याची एक वर्षाच्या कालावधीकरिता विनाशुल्क देखभाल, दुरुस्ती करणे व त्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीसाठी सशुल्क देखभाल व दुरुस्ती करणे तसेच सहा वर्षांच्या कालावधीसाठी जलमापकांचे रीडिंग घेण्याच्या व बिले तयार करून वितरण करण्याच्या कामाचा प्रामुख्याने समावेश आहे. यासाठी अंदाजखर्च तयार करताना उपलब्ध माहितीनुसार कनेक्शन्सची संख्या गृहीत धरण्यात आली आहे. हा प्रस्ताव तयार करताना ईईसी मीटर पुरविणे व बसविण्याचे दर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यांत्रिक विभागाच्या दरसूचीनुसार घेतल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार नौपाडा, उथळसर, कोपरी, वागळे, रायलादेवी व कळवा प्रभाग समित्या मिळून एकूण १५ हजार २९० नळ कनेक्शन्सवर ईईसी पद्धतीची मीटर्स बसविली जाणार आहेत. यासाठी १२ कोटी ६१ लाख ७४ हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ती बसविल्यानंतर येथील ग्राहकांना टेलिस्कोपिक दराने देयके अदा करणे शक्य होणार आहे. आता प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कधी होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
ठाण्यात १५ हजार नळांंवर बसणार मीटर
By admin | Updated: January 16, 2015 22:55 IST