Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात गतिमंद मुलीवर पोळीभाजी केंद्रात बलात्कार

By admin | Updated: March 17, 2015 23:01 IST

सोळावर्षीय गतिमंद (विशेष) मुलीला नाश्ता देण्याचा बहाणा करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना नामदेववाडीतील बल्लारेश्वर पोळीभाजी केंद्रात घडली आहे.

ठाणे : सोळावर्षीय गतिमंद (विशेष) मुलीला नाश्ता देण्याचा बहाणा करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना नामदेववाडीतील बल्लारेश्वर पोळीभाजी केंद्रात घडली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून गणेश वाघ आणि गणेश बोरडे या दोन्ही कथित आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पीडित तरुणी ही ठाण्यातील संभाजीनगर परिसरात वास्तव्याला आहे. तिच्या आईवडिलांचे निधन झाले असल्यामुळे ती मामीकडे वास्तव्याला आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ती शाळेत जात असताना वाघ याने तिला नाश्ता देण्याचे आमिष दाखवून पोळीभाजी केंद्रात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तर बोराडे याने तिला शाळेत आणि घराच्या परिसरात घडल्या प्रकाराबाबत सांगून बदनामी करण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार केला. तिला गेल्या काही दिवसांपासून उलट्या होत असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले तेव्हा ती गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यानंतर, तिच्या कुटुंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तरुणीने दिलेल्या माहितीनुसार वाघ आणि बोरडे याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)