डोंबिवली : ठाकुर्ली येथील ‘मातृकृपा’ ही तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ९ वर पोचला आहे. काल रात्री अकराच्या सुमारास ही इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगा-याखाली आणखी अनेक नागरिक अडकले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी ही माहिती दिली.चोळे गावातील ही इमारत महानगरपालिकेने यापूर्वीच धोकादायक म्हणून जाहीर केली होती. तसेच दोनच दिवसांपूर्वी या इमारतीच्या जिन्याचा काही भाग कोसळला होता आणि त्यानंतर ही घटना आज घडली. घटनेनंतर महापालिकेच्या यंत्रणेने आणि स्थानिक नेत्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिकांच्या मदतीने त्यांनी बचावकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.