Join us
Daily Top 2Weekly Top 5

सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेची चाचण्यांची स्ट्रॅटेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:06 IST

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवास करून मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांवर पालिकेने करडी नजर ठेवली आहे. गाव वा अन्य ठिकाणी प्रवास ...

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवास करून मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांवर पालिकेने करडी नजर ठेवली आहे. गाव वा अन्य ठिकाणी प्रवास करून येणाऱ्या पर्यटकांसाठी कोरोना चाचण्यांची विशेष स्ट्रॅटेजी केली असून, त्याप्रमाणे रुग्ण निदान, अतिजोखमीच्या गटातील व्यक्ती, रुग्णांच्या संपर्कातील सहवासित यांचा शोध घेण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महानगर पालिकेने घरोघरी जाऊन कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दराच्या तुलनेत काही जिल्ह्यांमध्ये हा दर अधिक दिसून आला आहे. या पार्श्वभूमीवर चाचण्यांची गती वाढविण्यात येणार आहे. १४ सप्टेंबरपर्यंत राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर २.६ टक्के, तर मुंबईत हा दर १.३ टक्के असल्याचे दिसून आले आहे. पुण्यात हा दर ३.८ टक्के , अहमदनगर ५.५ टक्के, सांगलीत ३.८ टक्के, नाशिकमध्ये ३.७ टक्के, साताऱ्यात ३.५, उस्मानाबाद मध्ये ३.२ टक्के, सिंधुदुर्गमध्ये ३ टक्के दर असल्याचे दिसून आले आहे. कोरोना संसर्ग वाढीच्या दृष्टीने पॉझिटिव्हिटी दराचे हे प्रमाण चिंताजनक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

याविषयी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाच्या काळात प्रवास केला आहे. त्यामुळे अशा स्थितीत संसर्ग वाढण्याचा धोका कायम असल्याने लवकर निदान होण्यासाठी पालिकेच्या घरोघरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासाचा इतिहास असणाऱ्या चाकरमान्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय यासाठी काही विभागात विशेष चाचणी केंद्र उभारण्यात आले आहेत. गणेशोत्सव आणि निर्बंध शिथिल त्यामुळे राज्याच्या मुंबईतील दैनंदिन रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आता विभागीय अधिकाऱ्यांना निगेटिव्ह अहवाल आलेल्यांची पुन्हा ५-६ दिवसांनी चाचण्या करण्यास सांगितले आहे. शिवाय, मुंबईकरांनाही आवाहन करण्यात येते की, प्रवासाचा इतिहास असल्यास लक्षणांची वाट न पाहता त्वरित चाचणीसाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून शोध, निदान व उपचार या त्रिसूत्रीवर भर देऊन संसर्ग नियंत्रणास मदत होईल.