Join us

अकरावी प्रवेशाच्या सीईटीसाठी प्रश्नसंचाची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:08 IST

मुंबई : यंदा पहिल्यांदाच राज्य शिक्षण मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. १०० गुणांच्या ओएमआर ...

मुंबई : यंदा पहिल्यांदाच राज्य शिक्षण मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. १०० गुणांच्या ओएमआर पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेत बहुपर्यायी उत्तरे असलेले प्रश्न विचारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी दहावीची मंडळाची परीक्षा रद्द झाल्यानंतर ऑनलाइन शिक्षणावर आधारित अशी ही अशी परीक्षा देण्याची पहिलीच वेळ असणार आहे. याच पार्श्वभूमीवर सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सरावाकरिता प्रश्नसंच पुस्तिका देण्यात यावी का याची चाचपणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद करत आहे. ट्विटरच्या माध्यमातून विचारलेल्या एससीईआरटीच्या या प्रश्नाला मंगळवारी रात्रीपर्यंत ८० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी होय असाच प्रतिसाद दिला आहे.

यंदाच्या अकरावी प्रवेशासाठी राज्यात एक सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला असून ती आयोजित करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. अकरावी प्रवेशासाठीची ही सीईटी परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक असली तरी अकरावीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी ही असणार आहे. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यात ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिली आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या सीईटी गुणांच्या निकालावरून कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे ही सीईटी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. ही सीईटी जुलैअखेर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांना याच्या तयारीसाठी महिन्याभराचा वेळ मिळणार आहे. मात्र, दहावीच्या अभ्यासावर बहुपर्यायी उत्तरे असणारी परीक्षा देण्यासाठी विदयार्थ्यांना वेगळ्या पद्धतीने अभ्यास आणि तयारी ठेवावी लागणार असल्याचे मत अनेक शिक्षक आणि विद्यार्थीही व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर या तयारीसाठी एससीईआरटीकडून विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नसंच सुविधा हवी का? यासंदर्भात विद्यार्थी पालकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मराठीच्या समर्थनार्थ पत्र

दरम्यान, अकरावी सीईटीमध्ये इंग्रजी, गणित, समाजशास्त्र, विज्ञान या विषयांचा समावेश करण्यात आला असून मराठीला वगळल्याने मराठी शाळांतील विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याचे मत अनेक मराठी शिक्षक, पालक संघटना, शाळांनी व्यक्त केले आहे. प्रथम भाषा मराठी असणाऱ्या विद्यार्थ्यांवर सीईटी परीक्षेत अन्याय होऊ नये यासाठी मराठी शाळा संस्थाचालक संघटनेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठीच्या समर्थनार्थ पत्र लिहिले आहे.