Join us  

'अधिकाऱ्याची नार्को चाचणी करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 3:05 AM

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची मागणी

मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळा (पीएनबी) प्रकरणातील मुख्य सूत्रधार व बँकेचे माजी अधिकारी गोकुळनाथ शेट्टी याची पॉलीग्राफ व नार्को चाचणी घेण्याची परवानगी मिळावी, यासाठी सीबीआयने विशेष न्यायालयात अर्ज केला आहे.सुमारे १३,७०० कोटी रुपये घोटाळा प्रकरणी नीरव मोदी व मेहुल चोक्सी मुख्य आरोपी आहेत. घोटाळा झाला, त्यावेळी पीएनबीच्या ब्रॅडी हाउस शाखेचा उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी होते. शेट्टीला हाताशी धरून घोटाळा करण्यात आला. त्यामुळे त्याला कोणते आर्थिक फायदे मिळाले, हे जाणून घ्यायचे आहे, असे सीबीआयने अर्जात म्हटले.इतक्या मोठ्या रकमेचा घोटाळा करूनही आरोपीची संपत्ती त्या तुलनेने फार कमी आहे. त्यामुळे शेट्टीचे अन्य हेतू, त्याला मिळालेल्या अन्य फायद्यांची माहिती मिळवायची आहे. त्यामुळे त्याच्या नार्को, पॉलीग्राफ चाचणीस परवानगी द्यावी, अशी विनंती सीबीआयने केली आहे. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेट्टी व त्याची पत्नी आशालता यांना बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी अटक केली आहे. ‘लेटर आॅफ अंडरस्टँडिंग’ (एलओयू) देण्याकरिता आवश्यक असलेली बँकेची प्रक्रिया पार न पाडताच, मोदी व चोक्सी यांना एलओयू दिल्याचा आरोपही शेट्टीवर आहे. न्यायालयाने सीबीआयच्या या अर्जावर १४ आॅगस्ट रोजी सुनावणी ठेवली आहे.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक