Join us

दोन्ही आमदारांच्या नेतृत्वाची कसोटी

By admin | Updated: April 21, 2015 05:40 IST

महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शहरातील दोन्ही आमदारांच्या नेतृत्वाची कसोटी लागली आहे. संदीप नाईक यांच्यासमोर पक्ष सोडून शिवसेनेत गेलेल्या ९

नामदेव मोरे, नवी मुंबईमहानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शहरातील दोन्ही आमदारांच्या नेतृत्वाची कसोटी लागली आहे. संदीप नाईक यांच्यासमोर पक्ष सोडून शिवसेनेत गेलेल्या ९ जणांना हरविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. भाजपाचा शहरात एकच नगरसेवक असून, दोन आकडी संख्या गाठण्यासाठी मंदा म्हात्रे यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.गणेश नाईक विरोधात सर्व पक्ष असे लढाईचे स्वरूप असले तरी दोन्ही आमदारांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा व विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला असला तरी संदीप नाईक यांनी ऐरोलीची जागा राखली आहे. महापालिका निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीच्या एम. के. मढवी, कमलताई पाटील व शिवराम पाटील या तीन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मढवी यांनी थेट संदीप नाईक यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते. कमलतार्इंनी सातत्याने डावलल्याने पक्ष सोडला असून, शिवराम पाटीलही दोन वर्षांपासून पक्षात नाराज होते. हे तीनही प्रमुख पदाधिकारी, त्यांचे नातेवाईक व जवळचे कार्यकर्ते मिळून ९ ठिकाणी उमेदवारी दिली आहे. ऐरोलीमधून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याबरोबर या ९ मतदार संघांतील सेनेच्या उमेदवारांना हरविण्याचे आव्हान नाईकांसमोर आहे. विधानसभा निवडणुकीपेक्षाही या प्रभागांमधील लढती प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. राष्ट्रवादीने बंडखोरी केलेल्यांच्या मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी केली असली तरी किती यश मिळणार हे २३ एप्रिललाच स्पष्ट होईल. बेलापूर मतदारसंघामधून मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांना पराभूत केले होते. पालिकेच्या निवडणुकीची पूर्ण शहराची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भाजपा ४३ जागा लढवत असून त्यामधील २३ जागा बेलापूर मतदारसंघातील आहेत. म्हात्रे यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या सीबीडी ते सीवूडपर्यंत पक्षाने जास्त जागा घेतल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये शहरात पक्षाची एकच नगरसेविका आहे. यावेळी किमान दोन आकडी संख्या गाठावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये म्हात्रे यांचा विजय मोदी लाटेमुळे झाल्याचे अनेक जण बोलत आहेत. परंतु हा विजय फक्त लाटेचा नसून आतापर्यंत केलेल्या कामाचा असल्याचे त्यांना आता सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे म्हात्रे यांनीही जोरदार प्रचार सुरू केला आहे. राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमकपणे भाषणे करण्यास सुरवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही सभा घेतली आहे. भाजपाला सर्वाधिक त्रास सेनेच्या बंडखोरांचा होत आहे.