गोरेगावमधील स्टुडिओला आग
जीवितहानी नाही; चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडला प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगावच्या बांगुरनगरमधील स्टुडिओला मंगळवारी दुपारी आग लागली. एका चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना हा प्रकार घडला असून अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
बांगुरनगर येथील इन ऑरबीट मॉलमागे असलेल्या लक्ष्मी पार्कच्या मोकळ्या जागेत चित्रपटाचा स्टुडिओ उभारण्यात आला होता. येथे सुप्रसिद्ध अभिनेता प्रभास याची मुख्य भूमिका असलेल्या ‘आदीपुरुष’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी सव्वाचारच्या सुमारास आग लागली. आगीच्या मोठ्या ज्वाळा स्टुडिओतून बाहेर येऊ लागल्याचे स्थानिकांनी पाहिले. त्यानंतर अग्निशमन दलाचे ८ फायर इंजीन तसेच तीन पाण्याचे टँकर घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या ठिकाणी जवळपास १०० कामगार कार्यरत हाेते, अशी माहिती आहे.
या स्टुडिओला स्थानिकांकडून विरोध असल्याचे जवळच असलेल्या जानकी राम हाउसिंग सोसायटीतील सदस्यांनी सांगितले. या प्रकरणी पालिकेकडे त्यांनी अनेकदा तक्रारही केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असाही आरोप होत आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र स्टुडिओतील सर्व सामान जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवले. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नसून अधिक चौकशी सुरू आहे.
.......................