Join us

महाकुंभमेळ्यासाठी टेन्ट, फ्लाईट बुकिंग व्यावसायिकाला पडली महागात; लाखो रुपये उकळले!

By गौरी टेंबकर | Updated: January 6, 2025 11:43 IST

महाकुंभमेळ्यासाठी ऑनलाइन टेन्ट (तंबू) बुकिंग करणे ७५ वर्षीय व्यावसायिकाला महागात पडले.

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई

महाकुंभमेळ्यासाठी ऑनलाइन टेन्ट (तंबू) बुकिंग करणे ७५ वर्षीय व्यावसायिकाला महागात पडले. एका अनोळखी साइटवरून त्यांनी मोबाईल क्रमांक घेत त्यावर लाख रुपये पाठवले. जे लंपास करण्यात आले असून या विरोधात वर्सोवा पोलिसात धाव घेतल्यावर बीएनएस कायद्याचे कलम ३१८(४) माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६(सी) अंतर्गत अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार अंधेरी पश्चिमच्या सात बंगला परिसरात राहत असून त्यांची एक फार्मा फॅक्टरी आहे. त्यांना जानेवारी व फेब्रुवारी २०२५ मध्ये उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये असलेल्या महामुकुंभमेळ्यासाठी मुलीसह जायचे होते. त्यानुसार त्यांनी घरी असताना १८ डिसेंबर रोजी google वर जाऊन www. Mahakumbhcottage reservation.com या अनोळखी साईट वरून मिळालेला मोबाईल क्रमांक डायल केला. कॉल उचलणाऱ्यांनी तक्रारदाराला स्वतःचे नाव न सांगता बुकिंगबद्दल सर्व माहिती देत त्यांच्या पत्नीच्या व्हाट्सअपवर सर्व डिटेल्स पाठवल्या. टेन्ट बुकिंगसाठी तीन लोकाना १४ हजार रुपये भरावे लागतील असे आधी त्यांना सांगण्यात आले. तक्रारदाराने ते पैसे पाठवल्यावर समोरच्या व्यक्तीने तिघांची रिसीट पाठवली. त्यानंतर फ्लाईट बुकिंग करण्यासाठी तिघांच्या तिकिटाचे ८८ हजार ७८६ रुपये सांगितले गेले. तक्रारदाराच्या मुलाने ते पैसे भामट्यांनी दिलेल्या अकाउंट नंबरवर पाठवल्यावर त्याची देखील रिसीट देण्यात आली. मात्र फ्लाईट कन्फर्म झाली असल्यास आम्हाला तिकिटे पाठवा असे तक्रारदाराने सांगितल्यावर आरोपींनी टाळाटाळ करायला सुरुवात केली. तक्रारदाराने वारंवार विनंती केल्यावर ७२ तासात तुम्हाला तिकीटे मिळतील असे त्यांना सांगण्यात आले. मात्र त्यानंतर देखील त्यांना तिकीट मिळाली नाही आणि आरोपीना यासाठी फोन तसेच मेसेज केल्यावर त्यांनी प्रतिसाद देणे बंद केले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी वर्सोवा पोलिसात जाऊन याप्रकरणी तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. लाखो भाविक हे महाकुंभमेळ्यामध्ये दाखल होतात. त्याचाच फायदा भामट्यांनी अशा प्रकारे घेण्यास सुरुवात केली असून नागरिकांनी सतर्क राहून कोणत्याही अनोळखी साइटवर क्लिक करू नये किंवा पैसे पाठवू नये असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :मुंबई