Join us
Daily Top 2Weekly Top 5

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा प्रक्रिया लांबणीवर

By admin | Updated: April 21, 2016 03:05 IST

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदा ५ मे रोजी काढण्यात येतील. शिवाय यासंदर्भातील मागण्यांसाठी आंदोलकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घालून दिली जाईल

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदा ५ मे रोजी काढण्यात येतील. शिवाय यासंदर्भातील मागण्यांसाठी आंदोलकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घालून दिली जाईल, असे आश्वासन धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मलकुमार देशमुख यांनी आंदोलकांना दिले. या आश्वासनानंतर आंदोलकांनी बुधवारी आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा केली.धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सेक्टर एकमधील रहिवाशांना ३५० ऐवजी ७५० चौरस फुटांचे घर देण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. शिवाय या मागणीसाठी वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयासमोर तीन दिवसांपासून आंदोलनही छेडले होते. माटुंगा लेबर कॅम्प, शाहूनगर, बालिगा नगर, गीतांजली नगर, आर. पी. नगरमधील रहिवाशांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. जोवर मागण्या मान्य होत नाहीत तोवर धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा काढण्यात येऊ नये, असे म्हणणेही लावून धरले होते.बुधवारी यासंदर्भातील निविदा काढण्यात येणार होत्या. परंतु आंदोलकांनी आंदोलन अधिक तीव्र केल्यानंतर निर्मलकुमार देशमुख यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. शिवाय समस्या जाणून घेत संबंधितांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले. महत्त्वाचे म्हणजे यासंदर्भातील निविदा ५ मे रोजी काढल्या जातील, असेही नमूद केले. या आश्वासनाचे आंदोलकांनी स्वागत करत जल्लोष केला. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी डीआरपीच्या निविदा काढण्यात येणार होत्या. परंतु विकासकांनी थंड प्रतिसाद दिल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. (प्रतिनिधी)