Join us

पावसाळी आजारांच्या होर्डिंग्जसाठी निविदा, पालिकेकडून जनजागृती; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 08:51 IST

मुंबईमध्ये राज्यातील एकूण मलेरिया रुग्णसंख्येतील ३६.५ टक्के रुग्णांची नोंद झाली.

मुंबई : पावसाळ्यानंतर राज्यात मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, एकूण रुग्णसंख्येमध्ये मुंबईतील मलेरिया रुग्णांचा टक्का सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

मुंबईमध्ये राज्यातील एकूण मलेरिया रुग्णसंख्येतील ३६.५ टक्के रुग्णांची नोंद झाली. उपलब्ध माहितीनुसार, राज्यात ८०४० पैकी २९८५ मलेरिया रुग्ण हे मुंबईत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून यासंबंधी आता वॉर्डनिहाय जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पालिकेच्या आरोग्य शिक्षण विभागाकडून जनजागृतीसाठी मुंबईच्या २४ वॉर्डांमध्ये राष्ट्रीय अभियानाचे होर्डिंग्ज लावले जाणार असून, त्यासाठी निविदा ही मागविल्या आहेत. निविदानंतर या होर्डिंग्जची संख्या व स्थाने निश्चिती केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

अशी होत आहे कार्यवाही

 इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, टेरेसवर टाकलेले अडगळीचे सामान, झोपडपट्टीमधील पाण्याचे ड्रम, प्लास्टिक ताडपत्रीमध्ये पावसाचे साचलेले पाणी, भंगार वस्तू, बांधकामे इत्यादींची तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान डासाच्या अळ्या आढळून आल्यास उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात येत आहेत.

टॅग्स :मुंबई