Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वे मार्गावर १ फेब्रुवारी ते २३ मार्चपर्यंत दहा हजार विनामास्क प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे; परंतु अनेक प्रवासी विनामास्क लोकल प्रवास करतात. त्यामुळे, अशा प्रवाशांवर पालिका आणि रेल्वेकडून कारवाई करण्यात येत आहे. १ फेब्रुवारी २३ मार्चदरम्यान १०००० प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून २० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनामास्क लोकल प्रवासासाठी मुभा नाही. लोकल प्रवाशांना नियम पाळण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले होते. मात्र, काही प्रवासी विनामास्क प्रवास करीत आहेत, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढत आहे. विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे आणि महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार मध्य रेल्वे मार्गावर १ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान १०००० प्रवाशांवर कारवाई करून २० लाख रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे.

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यासाठी महापालिकेने कर्मचारी तैनात केले आहेत. दरम्यान, काही प्रवासी दंड न भरता बिनधास्त प्रवास करीत आहेत, तर काही प्रवासी दंड भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्याचे स्वरूप नंतर भांडणात होते, त्यामुळे अखेर स्थानकावरील रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी येऊन कारवाई करीत आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर ५७५९ विनामास्क प्रवासी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. अनेक जण विनामास्क प्रवास करीत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर १ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान ५७५९ प्रवाशांवर कारवाई करून ९ लाख २६ हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे.