उरण : दहा महिन्यांपूर्वी उरणच्या खाडीत मानवी शरीराचे अवयव मिळाले होते. या मागील खुनाचे रहस्य उरण पोलिसांनी शिताफिने शोधले आहे. उरण-कोळीवाड्यातील तरुण जय नारायण कोळी (२८) याला पूर्ववैमन्यस्यातून मारुन त्याच्या शरीराचे अवयव खाडीत फेकणाऱ्या शफी अब्दुल मजीद शेख (२५, रा. उरण) आणि त्याच्या साथीदाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या . पोलीसांच्या माहितीनुसार १६ मार्च २०१४ रोजी बोरी-पाखाडी इंदिरा नगर झोपडपट्टी लगतच्या खाडीकिनाऱ्यावर कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत माणसाच्या मांडीचे अवयव सापडले होते. तपासात पोलिसांना अज्ञाताचा धारदार शस्त्राने खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे अवयव गाठोड्यात बांधून समुद्रात फेकल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हाही दाखल केला होता. त्याचदरम्यान जय नारायण कोळी (रा. उरण-कोळीवाडा) हा तरुण कामावरुन परतला नसल्याने त्याच्या वडिलांनी उरण पोलीस ठाण्यात त्याची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. बेपत्ता झालेल्या जयचा मिळालेल्या अवयवांशी संबंध असावा, असा संशय पोलिसांना आला. लागलीच पोलिसांनी मांडीचे अवयव डीएनए चाचणी करण्यासाठी पाठविले. या डीएनए चाचणीनंतर ते अवयव हरविलेल्या जय कोळी याचेच असल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. शफीची आई आजारी असल्याने तिला उपचारासाठी मुंबई येथे दाखल केले होते. घरी कोणीही नसल्याची संधी साधून १३ मार्च २०१४ रोजी जयला सायंकाळी ७.३० वाजता त्याने घरी बोलावले. घरी आल्यानंतर जयशी शफीने भांडण उकरुन काढीत घरातच त्याच्या गळ्यावर सुऱ्याने वार करुन त्याला ठार केले. त्यानंतर त्याने मित्र जावेद मोहमद शफी शेख याला बोलाविले. मित्राच्या मदतीने जयच्या मृतदेहाचे निर्दयपणे वेगवेगळे तुकडे केले. ते वेगवेगळ्या गाठोड्यात बांधून खाडीत फेकून दिले. जयने आणलेली मोटरसायकल सीबीडी स्टेशनच्या पार्किंगमध्ये उभी केल्याची कबुली आरोपींनी दिली. जयच्या मांडीचे अवयव पोलिसंना सापडल्याने शफी शेख आणि त्याचा साथीदार गजाआड झाला. (वार्ताहर)राग मनात धरून काटा काढलाच्अवयव बांधण्यासाठी लहान मुलाचा अंगरखा वापरण्यात आला होता. तपासात हा अंगरखा शफी अब्दुल मजीद शेख (रा. समय्या बिल्डींग, उरण) याच्या घरातील असल्याचे निष्पन्न झाले. लागलीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता जय कोळी याने काही दिवसांपूर्वी आपणास मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे जयबाबत मनात राग निर्माण झाला होता. त्याचा काटा काढण्याचा निश्चय शफी शेखने पक्का केला.
दहा महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचे गूढ उकलले
By admin | Updated: January 24, 2015 01:17 IST