Join us  

तापमानाचा पारा चढल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र तापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 5:23 AM

उन्हाच्या वाढत्या झळा । बहुतांश शहरांचे कमाल तापमान ३८ अंश

मुंबई : मुंबईसह राज्यातील शहरांच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. शनिवारी मुंबईचे किमान तापमान २२, तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १५.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, थंडी कमी झाली असून, तापमानाचा पारा चढल्यामुळे राज्यातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान थेट ३८ अंशावर आले आहे. कमाल तापमानाने घेतलेल्या उसळीमुळे मुंबईसह महाराष्ट्र तापला आहे. मुंबईचे कमाल तापमानही ३६ अंश नोंदविण्यात येत असल्याने उन्हाच्या झळा वाढत आहेत.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाडा, तसेच विदर्भाच्या काही भागांत तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात लक्षणीय वढ झाली आहे.

कोकण, गोव्याच्या काही भागांत व विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.

विदर्भाला पावसाची शक्यताविदर्भात २४ ते २५ फेब्रुवारीदरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे नोंदविण्यात येईल. २६ ते २७ फेब्रुवारीदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. रविवारसह सोमवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६, १९ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.२१, २२ फेब्रुवारीला नोंदवलेले शहरांचे कमाल तापमाननाशिक ३५, मालेगाव ३९.२, जळगाव ३६, पुणे ३६.२, बारामती ३६.३, सातारा ३६.३,सांगली ३७.२, सोलापूर ३८.५, जेऊर ३७, कोल्हापूर ३५.८, औरंगाबाद ३५.७,च्बीड ३८.७, नांदेड ३७.५, परभणी ३८.७, अकोला ३७.६, अमरावती ३८.२, बुलडाणा ३५.२, चंद्रपूर ३८, गोंदिया ३५.४, नागपूर ३७.४, वाशीम ३६, वर्धा ३८.७, यवतमाळ ३७.

टॅग्स :उष्माघात