मुंबई : तेलमाफिया व कोटय़वधींच्या रक्तचंदनाच्या तस्करीतील मुख्य आरोपी महंमद अलीचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. गुन्हे शाखा मंगळवारी त्याच्या पोलीस कोठडीसाठी नव्याने अर्ज करणार आहेत. तूर्तास अलीची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे.
गेल्या आठवडय़ात अंमलबजावणी संचलनालय, तटरक्षक दल आणि गुन्हे शाखेच्या निवडक अधिका:यांनी संयुक्त कारवाईत दुबईला निघालेल्या अल मारवा या गलबतावर छापा घालून सुमारे वीसेक किलो रक्तचंदनाचा साठा हस्तगत केला. या कारवाईत 18जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून महंमद अलीचे नाव समोर आले. त्यानुसार शनिवारी त्याला अटक करण्यात आली.
मात्र त्याआधीच अलीने सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला होता. ही घडामोड त्याने व त्याच्या वकिलाने गुन्हे शाखेपासून दडवली. अलीला जेव्हा रिमांडसाठी दंडाधिकारी न्यायालयात हजर केले गेले तेव्हा हा गौप्यस्फोट केला गेला. त्यामुळे दंडाधिका:यांनी अलीला न्यायालयीन कोठडीत धाडले. दरम्यान, आज गुन्हे शाखेने सत्र न्यायालयात अर्ज करून अलीचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी केली. न्यायालयाने जामीन रद्द करत त्याला न्यायालयीन कोठडीत धाडले. (प्रतिनिधी)