मुंबई: उसने घेतलेले पैसे परत न केल्याने विलेपार्ले येथे राहणार्या मारी देवेंद्र (३६) या तरुणाची त्याच्याच दोन मित्रांनी चाकूने भोसकून हत्या केली. शनिवारी ही घटना येथील कैफ अजी पार्क परिसरात घडली असून याबाबत जुहू पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपींना गजाआड केले आहे.विलेपार्लेच्या नेहरु नगर झोपडपीत मारी हा सासू-सासरे आणि पत्नीसह राहत होता. वर्षभरापूर्वी त्याने मधुराई देवेंद्र (४०) या आरोपीकडून १५ लाख रुपये उसने घेतले होते. मात्र, वेळ मर्यादा संपल्यानंतर देखील तो पैसे परत करु शकला नाही. आरोपीने अनेकदा त्याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, मारीने पैसे देण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे आरोपी आणि मारी यांच्यात अनेकदा वादही झाले होते. नेहमी होणारे हे वाद मिटवण्यासाठी आरोपीने मारीला शनिवारी कैफ अजी पार्क येथे बोलावले होते. त्यानुसार सायंकाळी ४च्या सुमारास मारी घटनास्थळी पोहचला. यावेळी देखील या दोघांमध्ये पैशांवरुन पुन्हा वाद झाला. मारीने पैसे देण्यास नकार देताच आरोपी मधुराई आणि त्याच्यासोबत असलेला त्याचा ड्रायव्हर परवेश देवेंद्र (३४) यांनी मारीवर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. छातीवर हातावर आणि मानेवर असे तब्बल १७ वार त्यांनी मारीवर केले. त्यानंतर दोघांनी तिथून पळ काढला.परिसरातील काही रहिवाशांनी ही बाब पोलिसांना सांगताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मारीला कुपर रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. जुहू पोलिसांनी याबाबत हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला असता आरोपींची नावे समोर आली. त्यानुसार अंधेरी परिसरातून पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. (प्रतिनिधी)
पैशांच्या वादातून तरुणाची हत्या
By admin | Updated: August 24, 2014 22:50 IST