Join us

केबल दुरुस्तीसाठी आलेला तंत्रज्ञ निघाला चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 06:27 IST

केबल दुरुस्तीसाठी आलेल्या तरुणाने घरातील साडेचार तोळ्यांच्या मंगळसूत्रावर हात साफ केल्याची धक्कादायक घटना दादरमध्ये घडली.

मुंबई : केबल दुरुस्तीसाठी आलेल्या तरुणाने घरातील साडेचार तोळ्यांच्या मंगळसूत्रावर हात साफ केल्याची धक्कादायक घटना दादरमध्ये घडली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादर पश्चिमेकडील सेनापती बापट मार्गावर राहणाऱ्या नेहा दिलीप सावंत (५३) यांच्या घरात हा प्रकार घडला. ९ सप्टेंबर रोजी ते गावावरून घरी परतले. त्याच दरम्यान त्यांचा सेट टॉप बॉक्स बंद असल्याचे लक्षात आले. त्यांनी टाटा स्काय कंपनीच्या कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क साधून याबाबत तक्रार केली. त्यानुसार, कंपनीच्या रिप्रेझेंटीव्हने दुरुस्ती करण्याकरिता टेक्निशियन पाठवित असल्याबाबत त्यांच्या पतीला कळविले. १० सप्टेंबर रोजी कंपनीचा टेक्निशियन त्यांच्या घरी आला. त्याने सेट टॉप बॉक्स दुरुस्त करून दिला. त्यानंतर, १३ तारखेला त्यांचे पती कामानिमित्त बाहेर गेले. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी धडकली.टाटा स्कायची डीश दुरुस्त करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून त्याला घरात घेतले. त्यांनी संबंधित तरुणाचे मोबाइलवरून पतीशी बोलणे करून दिले. त्यानंतर, तरुणाने टाटा स्काय सेट टॉप बॉक्समधील कार्ड बाहेर काढले व कार्ड स्क्रॅच करण्यासाठी सोन्याच्या धातूची आवश्यकता असल्याचे सांगितले. कदम यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेले त्यांचे सोन्याचे साडेचार तोळ्यांचे मंगळसूत्र तरुणाच्या हातात दिले. पुढे, बेडरूममध्ये केबल आहे का बघा? असे बोलून त्यांनी कदम यांना बेडरूममध्ये जाण्यास सांगितले. त्या बेडरूमच्या दिशेने जाणार तोच तरुणाने घरातून काढता पाय घेतला.त्यांनी मागे वळून पहिले तेव्हा, कदम घाईघाईत निघताना दिसला. त्यांनी मंगळसूत्राबाबत विचारताच, मंगळसूत्र तेथेच ठेवल्याचे सांगून तो निघून गेला. मात्र त्यांना मंगळसूत्र मिळून आले नाही. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने संबंधित तरुणाचा शोध घेतला; मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाला होता.अखेर यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शुक्रवारी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस अधिक तपास करीत आहेत.