Join us
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट कार्यालयाच्या संकेतस्थळात तांत्रिक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:05 IST

मुंबई : पारपत्र (पासपोर्ट) कार्यालयाच्या संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाल्याने २२ जूनपर्यंतच्या काही नोंदण्या (अपॉईंटमेंट) रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ...

मुंबई : पारपत्र (पासपोर्ट) कार्यालयाच्या संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाल्याने २२ जूनपर्यंतच्या काही नोंदण्या (अपॉईंटमेंट) रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित अर्जदारांना पुनर्नोंदणी करावी लागणार आहे.

मुंबईस्थित प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने या वृत्तास दुजोरा दिला आहे. कोरोनामुळे लागू असलेले निर्बंध आणि तांत्रिक कारणांमुळे २२ जूनपर्यंतच्या काही नोंदण्या रद्द केल्याचे या कार्यालयाकडून सांगण्यात आले. या तारखेपर्यंत नोंदणी केलेल्या अर्जदारांनी आपल्या अपॉईंटमेंटची सद्यस्थिती तपासूनच पासपोर्ट कार्यालयाला भेट द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या वाढल्याने एप्रिलपासून पासपोर्ट कार्यालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आले. अडीच महिन्यानंतर जूनमध्ये कामकाज सुरू केल्यापासून ताण प्रचंड वाढला आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, लसीकरणाअभावी अडकलेल्या नोकरदारांनीही पारपत्र नूतनीकरणासाठी अर्ज करण्यास सुरुवात केल्याने नेहमीच्या तुलनेत अर्जांची संख्याही वाढली आहे. परिणामी, संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाला असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

दरम्यान, अर्जदारांनी पासपोर्ट कार्यालयाला भेट देण्यापूर्वी आपल्या नोंदणीची सद्यस्थिती तपासून घ्यावी. अपॉईंटमेंट ॲक्टिव्ह असलेल्यांनाच कार्यालयात प्रवेश दिला जाईल. नोंदणी रद्द झालेल्या अर्जदारांनी आपल्या सोयीनुसार पुनर्नोंदणी करावी. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पासपोर्ट अपॉईंटमेंट पुनर्नोंदणीवरची मर्यादा शिथिल केल्याची माहिती प्रादेशिक पारपत्र कार्यालयाकडून देण्यात आली.