Join us

रश्मी शुक्लांच्या चौकशीसाठी पथक लवकरच हैदराबादला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:06 IST

सायबर पोलीस जबाब नोंदविणार; गोपनीयता भंग गुन्हा प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला ...

सायबर पोलीस जबाब नोंदविणार; गोपनीयता भंग गुन्हा प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याकडे गोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी सायबर पोलिसांचे पथक लवकरच हैदराबादला जाणार आहे. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी त्यांच्याकडे चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

शुक्ला या प्रतिनियुक्तीवर केंद्रीय राखीव पोलीस दलात हैदराबाद येथे कार्यरत आहेत. सायबर पोलिसांनी बजावलेल्या समन्सच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले असून, त्यांच्याकडील चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे एका उपायुक्ताच्या नेतृत्वाखाली तपास अधिकारी साहाय्यक आयुक्त एन. के. जाधव व अन्य पोलीस हैदराबादला जाऊन त्यांची चौकशी करतील. सोमवारी किंवा मंगळवारी शुक्ला यांचा जबाब नोंदविला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शुक्ला या महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख असताना फोन टॅपिंग प्रकरणाचा अत्यंत गोपनीय अहवाल त्यांनी तयार केला हाेता. तो फोडल्याबद्दल २६ मार्चला गोपनीय पत्र व अन्य गोपनीय तांत्रिक माहिती बेकायदेशीरपणे उपलब्ध केल्याप्रकरणी कलम ३० भारतीय टेलिग्राफ ॲक्ट१९८५ सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ कलम ४३ (ब), ६६ सह द ऑफिशियल सीक्रेट ॲक्ट १९२३च्या कलम ५ अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- साेमवार किंवा मंगळवारी नाेंदवणार जबाब?

फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल राज्याचे विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २३ मार्चला पत्रकार परिषदेत जाहीर करून महाविकास आघाडी सरकारचा कारभार भ्रष्ट असल्याची टीका केली होती, तर सत्ताधारी नेत्यांनी संबंधित अहवाल खोटा असल्याचे सांगत रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप केला होता. याबाबत चौकशीला हजर राहण्यासाठी सायबर पोलिसांनी दोनवेळा समन्स बजाविले होते, मात्र शुक्ला यांनी अटकेच्या भीतीने मुंबईला येण्यास नकार दिला. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. आता सोमवारी किंवा मंगळवारी शुक्ला यांचा जबाब नोंदविला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

---------------------