Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण ऑनलाइन, परीक्षा ऑफलाइन का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:06 IST

विद्यार्थी, पालकांचा प्रश्न; भौगोलिक परिस्थिती, सुविधांच्या उपलब्धतेनुसारच निर्णय घेतल्याची शिक्षणमंत्र्यांची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वर्षभर शिक्षण ऑनलाइन ...

विद्यार्थी, पालकांचा प्रश्न; भौगोलिक परिस्थिती, सुविधांच्या उपलब्धतेनुसारच निर्णय घेतल्याची शिक्षणमंत्र्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वर्षभर शिक्षण ऑनलाइन झालेले असताना आता दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजन ऑफलाइन का, असा प्रश्न विद्यार्थी, पालकांनी उपस्थित केला. राज्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाइन घेण्यासंदर्भात रविवारी मुंबईत निदर्शनेही केली. त्यानंतर सोमवारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दहावी व बारावीच्या गुणांच्या आधारावर त्यांना पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड स्पर्धा असते. अशावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःला सिद्ध करण्याची समान संधी मिळावी, कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये हा ऑफलाइन परीक्षेमागचा उद्देश असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. तसेच भौगोलिक परिस्थिती, सुविधांच्या उपलब्धतेनुसार हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

राज्यातून यंदा सुमारे १८ लाख विद्यार्थी दहावीची तर १६ लाख बारावीची परीक्षा देणार आहेत. या परीक्षा एकाच दिवशी व एकाच वेळी देणे अनिवार्य असते. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील भौगोलिक परिस्थितीचा विचारही यावेळी करणे आवश्यक होते. गडचिरोली, नंदुरबारसारखा आदिवासीबहुल भाग, कोकणातील पाडे तसेच इतर दुर्गम भागातील वस्त्यांमधील सुविधांची उपलब्धता लक्षात घेतल्यास ऑनलाइन परीक्षेत अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणीही होत आहे. यावर स्पष्टीकरण देताना शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, मे, जून महिन्यात मराठवाडा, विदर्भात अति तापमानाचा त्रास होतो, तर जुलै, ऑगस्टमध्ये कोकणासारख्या भागात अतिवृष्टीचे भीती असल्याने अशा परिस्थितीत परीक्षांचे आयोजन योग्य ठरणार नाही. संपूर्ण राज्यात बोर्डाची परीक्षा एकाच वेळी घेणे आवश्यक असल्यानेच परीक्षांचे नियोजन एप्रिल, मे मध्येच करणे हितावह ठरेल, असेही त्या म्हणाल्या.

* आझाद मैदानात निदर्शने

कोरोनाची वाढती संख्या आणि ठिकठिकाणी होणाऱ्या लॉकडाऊनमुळे परीक्षा पुढे ढकलल्यास त्याचा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाइनच घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी रविवारी केली. या मागणीसाठी रविवारी दुपारी १२.३० वाजता दहावी, बारावीचे जवळपास ४०० ते ५०० विद्यार्थी आझाद मैदानावर जमा झाले होते. दहावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ फाईव्हचा पर्याय देण्यात यावा, वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या वाढवावी. दोन पेपरमध्ये अंतर ठेवण्यात यावे. ५० गुणांची ऑफलाइन परीक्षा तर ५० गुण हे अंतर्गत मूल्यांकनावर देण्यात यावे, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी निदर्शने केली.

.........................